पुणे :- सोलारीस क्लब तर्फे आयोजित दहाव्या ‘सोलारीस करंडक’ जीएसटीए वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय टेनिस २०२४ स्पर्धेच्या ४५ वर्षावरील गटाच्या मुख्य फेरीत पुण्याच्या अमित किंडो, पराग शहा आणि धर्मेंद्र शर्मा यान खेळाडूंनी मानांकित खेळाडूंचा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली.
तसेच ३५ वर्षावरील गटामध्ये चौथ्या मानांकित नीरज आनंद, पुण्याच्या संतोष दळवी, यशराज उभे, अग्रमानांकित व कर्नाटकच्या जयेश सोळंकी, तामिळनाडूच्या मुरगून सी., पुण्याच्या अभिषेक चव्हाण, सातव्या मानांकित आणि पुण्याच्या रविंद्र पांड्ये आणि दुसर्या मानांकित आणि मुंबईच्या संदीप पवार या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून दुसरी फेरी गाठली.
मयुर कॉलनी येथील सोलारीस क्लब येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या मुख्य ड्रॉ फेरीच्या सामन्यांना आजपासून सुरूवात झाली. पुण्याच्या अमित किंडो याने चौथ्या मानांकित आणि गुजरातच्या राजीव अरोरा याचा ६-१, ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. पुण्याच्या आणि पात्रता फेरीतून मुख्य फेरीमध्ये प्रवेश केलेल्या पराग शहा याने पुण्याच्याच आणि पाचव्या मानांकित गिरीश कुकरेजा याचा २-६, ६-१, १०-६ असा सुपर टायब्रेकरमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला.
पुण्याच्या बिगर मानांकित धर्मेंद्र शर्मा याने मुंबईच्या आणि सातव्या मानांकित जीम वर्गीस मॅथ्यु याचा ६-१, ६-१ असा सरळ सेटमध्ये पराभव करत दुसरी फेरी गाठली. पुण्याच्या संदीप आगाटे याने पुण्याच्याच खेळाडू आणि पात्रता फेरीतून मुख्य फेरीमध्ये प्रवेश केलेल्या शंतिश परांजपे याचा ६-१, ७-६ (७-०) असा टायब्रेकमध्ये पराभव केला. पुण्याच्या आणि सहाव्या मानांकित सुजीत परसोडकर याने पुण्याचाच श्रीकांत परोपकारी २-६, ६-३, १०-३ असा सुपर टायब्रेकरमध्ये पराभव केला.