– डॉ. वीणा देव, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे – राष्ट्रनिर्माण कार्यात महिलांचाही मोलाचा सहभाग आहे. विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांनी एकत्र येऊन महिलांची परिस्थिती, महिलांचा देशकार्यातील सहभाग या बाबत विचार करावा, त्यांचे वैचारिक आदान प्रदान व्हावे आणि विविध विषयावर वैचारिक मंथन व्हावे या उद्देशाने कर्मयोगिनी आणि संवर्धिनी नावाने महिला संमेलनांचे आयोजन पुण्यात दोन ठिकाणी करण्यात आले आहे.
याविषयी संमेलनाच्या संयोजिका सुजाता कृष्णकांत सातव आणि सारिका वाघ यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी अखिल भारतीय अधिकारी डॉ. अंजली देशपांडे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संमेलन सहसंयोजिका अॅड. अपर्णा पाटील उपस्थित होत्या.
जनसेवा न्यास,
हडपसर आयोजित कर्मयोगिनी हे वडगावशेरी – हडपसर आणि येरवडा भागातील महिलांसाठीचे हे महिला संमेलन महालक्ष्मी लॉन्स, पुणे – नगर रोड, येथे होणार आहे तर दृष्टि स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र आयोजित सिंहगड – पर्वती आणि कात्रज परिसरातील महिलांचे संवर्धिनी हे संमेलन ७ जानेवारीला गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे. ही दोन ही संमेलने सकाळी १० ते सायंकाळी पाच यावेळेत होतील.
स्वदेश, स्वसंस्कृती आणि स्वत्व जपत प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या स्त्रीशक्तीचा जागर करण्यासाठी येत्या रविवारी दि. ७ जानेवारी रोजी कर्मयोगिनी महिला संमेलनाचे आयोजन सकाळी १० ते सायं. पाच यावेळेत महालक्ष्मी लॉन्स येथे केले आहे. अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी, शीतल महाजन उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत.