वकील संघाने दिला रास्ता रोकोचा इशारा
नेवासा – तालुक्यातील आदर्श गाव वडूलेचे सरपंच दिनकरराव गर्जे यांच्या वकील असलेल्या मुलावर जमिनीच्या वादातून प्राणघातक हल्ला केल्याची घटना दि.३० नोव्हेंबर रोजी दुपारी घडली होती. याबाबत ९ जणांवर जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा नेवासा वकील संघाने दिला.
नेवासा वकील संघाच्या वतीने पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. नेवासा वकील संघाचे सदस्य ॲड. प्रसाद दिनकर गर्जे व त्यांच्या कुटुंबीयांवर घरात घुसून आरोपींनी प्राण घातक हल्ला केला आहे. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, अद्यापपर्यंत कुठल्याही आरोपीस पोलिसांकडून अटक करण्यात आलेली नाही. आरोपी हे गर्जे कुटुंबीयांना धमक्या देत असून त्यांना तत्काळ अटक करावी, अन्यथा कुठलीही पूर्वसूचना न देता रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. कैलास कापसे, ॲड.गोकुळ भताने, ॲड.अजय रिंधे, ॲड.गणेश निकम, ॲड.गणेश खिळदकर, ॲड.साईनाथ हुळहळे, ॲड.नंदकुमार जोशी, ॲड.माधव काळे, ॲड.जावेद इनामदार, ॲड. आर.टी.पाठे, ॲड.सुभाष सकट, ॲड.इर्शाद सय्यद, ॲड. सुदाम ठबे, ॲड.भारत चव्हाण यांनी दिला.