बीड – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज बीडमध्ये दाखल होणार आहेत. बीडच्या परळीमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त ही मंडळी येथे उपस्थित राहणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे देखील एकत्र हजर राहणार आहेत. या निमित्ताने पुन्हा एकदा मुंडे भाऊ -बहीण एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत.
सत्ता समीकरणांच्या बदलानंतर राजकीय कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येत आहेत. विशेष म्हणजे परळी मतदारसंघात हा कार्यक्रम होत असल्याने धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे काय बोलणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षभरात दोन वेळा देवेंद्र फडणवीस हे बीडला आले. मात्र पंकजा मुंडे किंवा भाजप खासदार प्रीतम मुंडे या देवेंद्र फडणवीस यांच्या व्यासपीठावर गेल्या नाही. मात्र, आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे सुद्धा या पाहायला मिळतील.
दरम्यान, बीडच्या परळी शहरात शासन आपल्या दारी या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुपारी दीड वाजता नांदेड विमानतळावर येणार आहेत. त्यानंतर ते विमानतळावरुन हेलिकॉप्टरने परळीला रवाना होणार आहेत.
या कार्यकमानिमित्त परळीमध्ये स्वागतासाठी मोठमोठे बॅनर्स, झेंडे लावून सजवण्यात आली आहे. तसेच येथे येणाऱ्या नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, याची काळजी घेण्यात आली आहे.