पुणे : हुजूरपागा संस्थेच्या कात्रज येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दीपोत्सव साजरा करण्यात आला.
पुणे – महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन संस्थेच्या हुजूरपागा, कात्रज येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दीपोत्सव साजरा करण्यात आला. सर्वत्र विद्यार्थिनींनी केलेली दिव्यांची रोषणाई, रांगोळ्यांचे गालिचे, वार्यावर झुलणारे आकाशकंदील, फुलांची तोरणे यांनी शाळेचा परिसर सजला होता. कट आऊटची, ठिपक्यांची रांगोळी तसेच वडील व मुलगी या अनोख्या नात्याची आकाशकंदील व किल्ला बनविण्याची स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली.
कार्यक्रमाला सर्व मान्यवरांचे स्वागत पारंपरिक पद्धतीने ढोल-लेझीमच्या गजरात झाले. विशेष म्हणजे १९७३ सालचा दहावीचा मोगरा फुलला हा गट उपस्थित होता. दीपोत्सवाला अध्यक्षा शालिनी पाटील, सचिव रेखा पळशीकर यांच्यासह हिमानी गोखले, उषा वाघ तसेच सर्व पदाधिकारी आणि इतर विभागांच्या मुख्याध्यापिका आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थेच्या अध्यक्षा शालिनी पाटील यांनी विद्यार्थिनींना तिमिरातून तेजाकडे जाणार्या सणाची माहिती सांगितली. विद्यार्थिनी, मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक सर्वांनी मिळून ‘हुजूरपागा’ या नावामध्ये पणत्यांची रोषणाई केली. शाळेच्या मुख्याध्यापिका कीर्ती पंडीत, पर्यवेक्षिका अर्पिता कुलकर्णी, प्रि-प्रायमरीच्या मुख्याध्यापिका दिप्ती कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली दीपोत्सव मोठ्या दिमाखात पार पडला.