शहरात आता फेस रीडिंग सॉफ्टवेअर
तब्बल 2,880 ठिकाणी बसवणार यंत्रणा
पुणे – पुणे शहर पोलिसांनी अद्ययावत अशा फेस रीडिंग सॉफ्टवेअरचा वापर प्रायोगिक तत्वावर सुरू केला आहे. प्रामुख्याने गुन्हेगारी रोखण्यासाठी ही कॅमेरा यंत्रणा वापरली जाणार आहे. यात सध्या 2,880 ठिकाणी फिक्स स्वरुपात हे कॅमेरा बसवण्याचे नियोजन केले गेले आहे.
रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगारांची माहिती सॉफ्टवेअरला दिली जाते. बायोमेट्रिक स्वरुपाचे फेस रीडिंग सॉफ्टवेअर आहे. गर्दीमध्ये एकादा रेकॉर्डवरील गुन्हेगार गुन्हा करण्यास आला असता, हे सॉफ्टवेअर त्याला हेरते. यानंतर पोलीस यंत्रणेचा अलर्ट दिला जातो. त्याचा ठावठिकाणा आणि मागही काढला जातो. विशेषत: यात्रा-जत्रा, उत्सव, गर्दीच्या बाजारपेठा आदी ठिकाणी पाकिटमार, मोबाइल चोर, सोनसाखळी चोर यांना पकडण्यास हे सॉफ्टवेअर अतिशय उपयुक्त ठरणार आहे.
महत्त्वाच्या सिग्नलच्या ठिकाणी ही यंत्रणा आणि सॉफ्टवेअर वापरले गेल्यास गुन्हेगारांच्या हालचालींची माहिती पोलिसांना मिळू शकते. संगणकात “फीड’ केलेल्या गुन्हेगाराच्या छायाचित्राशी मिळताजुळता व्यक्ती गर्दीत दिसल्यास सॉफ्टवेअर त्याला “कॅच’ करते. त्याचा चेहरा स्कॅन करुन तो संगणकातील छायाचित्राशी किती जुळतोश हे पाहिले जाते. तो तंतोतंत जुळत असल्यास लगेच त्याचे मागील गुन्हेगारीचे सर्व रेकॉर्ड संगणकावर येऊन पोलिसांना अलर्ट मिळतो.
हे सॉफ्टवेअर पोलिसांच्या वाहनात लावून ते वाहन गर्दीच्या ठिकाणी थांबवूनही त्याचा वापर करतो येतो, असे पोलिसांनी सांगितले.
अमेरिकेत होतो वापर अमेरिकेसारख्या प्रगत देशात अशा सॉफ्टवेअरचा वापर अनेक वर्षांपासून केला जात आहे. याचा वापर वाढल्यास गुन्हेगारांवर अंकुश राहणार आहे. रेल्वेस्थानक, एसटी स्थानक आदी सार्वजनिक ठिकाणी ही यंत्रणा अतिशय उपयुक्त ठरू शकते, असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
गर्दीच्या ठिकाणी होणार वापर
चतु:शृंगी मंदिराच्या आवारात नवरात्रोत्सवात प्रायोगिक तत्त्वावर बायोमेट्रिक आधारित फेस रिडिंग सॉफ्टवेअर बसवले होते. यामुळे बॅग हिसकावणे, पाकिटमार, चोरी आणि इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या संशयितांना पकडले आहे. दररोज मंदिराच्या आवारात प्रवेश करणाऱ्या पाच ते सहा संशयित महिला व पुरुषांना यंत्रणेने पकडले होते. यातील काही गुन्हेगार सराईत निघाले. यामुळे याचा वापर गणेशोत्सव, आंदोलने, गर्दीची ठिकाणे, बाजारपेठा आदी ठिकाणी करण्याचा पोलीस विचार करत आहेत.
पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा अत्यंत मर्यादित डाटा आम्ही यंत्रणेला उपलब्ध करून दिला असतानाही हा प्रयोग यशस्वी ठरला. आता हा प्रयोग शहरातील रस्त्यांवर नियमितपणे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांनासाठी करण्याचा विचार आहे. ट्रॅफिक सिग्नल, चोरीची वाहने आणि इतर गुन्ह्यांचा मागोवा घेण्यासाठी हे सॉफ्टवेअर उपयोगी आहे.
– रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे