Israel Hamas War : आंतरराष्ट्रीय स्तरावर हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्ध आजही सुरूच आहे. दरम्यान, हे युद्ध सुरु झाले होते तेंव्हा गाझा पट्टीचून हमासचा नायनाट केल्याशिवाय हे युद्ध थांबणार नसल्याचे इस्रायलने म्हटले होते. तर, आता इस्रायलने गाझातील अल शिफा रुग्णालयाला लक्ष्य केले असून येथील विशिष्ट जागेवर ऑपरेशन राबवले जात आहे. तसेच, हमासला आत्मसमर्पण करण्याचेही आवाहन इस्रायलच्या लष्कराकडून करण्यात आले आहे.
येत्या काही तासांत अल शिफा रुग्णालयावर हल्ला करण्यात येणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्यानंतर तासाभरातच आयडीएफने हमासला आत्मसमर्पण करण्याची सूचना दिली आहे, अशी माहिती गाझा आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली.
गेल्या दोन दिवसांपासून इस्रायलने गाझा पट्टीतील अल शिफा रुग्णालयाला लक्ष्य केले आहे. रुग्णालयात सर्वच वैद्यकीय सुविधांचा तुटवडा निर्माण झाला असून रुग्णांचा जीव धोक्यात आलेला आहे. तर दुसरीकडे इस्रालयाने या रुग्णालयावर हल्ले सुरूच ठेवले आहेत. या रुग्णालयावरील हल्ल्यांना हमासने इस्रायल आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना जबाबदार धरल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राने म्हटले आहे. त्यासोबतच पॅलेस्टाईन आरोग्यमंत्रालयानेही इस्रायलाच जबाबदार धरले आहे. दरम्यान, अल शिफा हे रुग्णालय आता धोक्याचे केंद्र बनले असल्याचेही सांगण्यात येत आहे.
गाझा पट्टीमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या ऑपरेशनसाठी ट्रकसाठी २४ हजार लिटर (६३४० गॅलन) डिझेल इंधन वापरण्यास इस्रायलने परवानगी दिली आहे, अशी माहिती रॉयटर्सने दिली आहे. इस्रायलने हमासविरोधात युद्ध पुकारल्यामुळे गाझामधील पॅलेस्टिनींना अन्न, पाणी आणि औषधे पोहोचवण्याच्या प्रयत्नांना इंधनाच्या तीव्र कमतरतेमुळे अडथळा निर्माण झाला आहे.
दरम्यान, गाझा पट्टीवर नरसंहार सुरू असतानाही हे युद्ध गाझातील नागरिकांविरोधात नसून हमासविरोधात असल्याचे इस्रालयकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ” हमासद्वारे मानवी ढाल म्हणून वापरल्या जाणार्या नागरिकांचे कोणतेही नुकसान होऊ नये याकरता आयडीएफ दलांमध्ये वैद्यकीय संघ आणि अरबी भाषिकांचा समावेश करण्यात आला आहे. ज्यांनी या जटिल आणि संवेदनशील वातावरणासाठी तयार होण्यासाठी विशिष्ट प्रशिक्षण घेतले आहे”, असे इस्रायल सैन्याने म्हटले आहे. त्यासोबतच “हमासला पराभूत करण्यासाठी आणि आमच्या ओलीसांना सोडवण्यासाठी IDF गाझामध्ये ग्राउंड ऑपरेशन करत आहे. इस्रायलचे हमासशी युद्ध चालू आहे, गाझामधील नागरिकांशी नाही,” असे इस्रायलने म्हटले आहे.