Kishori Pednekar : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) या मागील काही दिवसांपासून कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी चर्चेत आहेत. आज याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांची ईडीकडून चौकशी होणार आहे. किशोरी पेडणेकर यांना चौकशीला हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आल्यानंतर आज त्यांची चौकशी केली जाणार आहे. मात्र चौकशी होण्यापूर्वी किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया देत तपास यंत्रणांच्या प्रक्रियेवर यांनी प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहे.
काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर ?
ईडी कार्यालयाकडे जाण्यापूर्वी प्रसामाध्यमांशी संवाद साधताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, “ईडी कार्यालयात जात असून आज हजर राहण्याचं जे समन्स आहे. हा चौकशीचा भाग आहे. जवाब तो देनाही पडेगा, पण जवाब फक्त मीच नाही तर सर्वांनाच द्यावा लागेल. आता सरकारी यंत्रणांमध्ये राजकारण घुसलं आहे. पण त्यांना सहकार्य करणं आपलं कर्तव्य आहे. मुंबईकरांसाठी आम्ही चांगलं काम केलं आहे. हिशोब सर्वांना द्यावा लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगेन मी काहीही केलेलं नाही, “असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी यांनी आरोप फेटाळले आहेत.
पुढे त्या म्हणाल्या, “आज पर्यंत भरपूर लोकांवर आरोप झाले. ते आता मंत्री झाले आहेत. त्यामुळे जे खरं आहे ते बाहेर येऊ देत. आम्ही काम करत असताना कोणी घोटाळा केला असेल तर ते समोर आलंच पाहिजे. मी सुद्धा मागणी करेल पण फक्त आरोप करून प्रेशर आणयचं आणि स्वतःची काम करून घेणं चालणार नाही,” असेही पेडणीकर म्हणाल्या.
बॉडी बॅग घोटाळा प्रकरण –
मुंबई महापालिकेने करोना काळात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात येत होता. कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांना नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडीबॅग 2000 रुपयांऐवजी 6 हजार 800 रुपयांना खरेदी केल्याचे म्हंटले जात आहे. हे कंत्राट तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या सूचनेनुसार देण्यात आल्याचा आरोप ईडीने केला आहे. कोविड काळात किशोरी पेडणेकर या मुंबईच्या महापौर होत्या.
या कथित घोटाळ्यामध्ये तब्बल 49 लाखांपेक्षा अधिकची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी किशोरी पेडणेकर, नागरी अधिकारी आणि इतरांविरुद्ध 5 ऑगस्ट रोजी नोंदवलेल्या FIRवर आधारित हे प्रकरण आहे. त्यानुसार पेडणेकर यांची आज ईडीकडून चौकशी केली जात आहे.