पुणे – तायक्वांदो प्रशिक्षक म्हणून मास्टर राजेश पुजारी यांच्या कारकिर्दीला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल योधी तायक्वांदो अकादमीतर्फे रजतमणी या गौरव समारंभाचे नुकतेच आयोजन केले होते. पुजारी यांच्यासह अन्य तायक्वांदो प्रशिक्षक, साऊथ कोरियामध्ये यश मिळवलेले खेळाडू यांचा सन्मान करण्यात आला. तसेच 53 खेळाडूंना थर्ड डॅन, सेकेंड डॅन आणि फर्स्ट डॅन अशी ब्लॅक बेल्टमधील पदवी प्रदान करण्यात आली.
या समारंभासाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, प्रसंगी मास्टर चंद्रकांत भोसले, मालती कलमाडी, सुनीता शिरगुप्पी, संजना निकम, प्रमोद होले, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, योधी तायक्वांदो अकादमीचे पदाधिकारी नरेंद्र निकम, अभिजीत शिंदे, चंद्रकांत हरकुडे, केतकी पुजारी आणि मंगेश मोहिते आदी उपस्थित होते. मास्टर राजेश पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली 350 हून अधिक विद्यार्थ्यांनी या खेळांत ब्लॅक बेल्ट पदवी प्राप्त केली आहे.
“योधी तायक्वांदो अकॅडमी’च्या 16 शाखांमधून विद्यार्थ्यांना स्व-संरक्षण आणि तायक्वांदो खेळाचे धडे दिले जातात. या 16 शाखांमधील सुवर्णा जोगळेकर, मनीषा गद्रे, योगेश ठीक, स्मिता सावर्डेकर, विजय ढेणे, आकाश तुपसुंदर, माधव जोरी या सर्व प्रशिक्षकांचा सन्मान केला. दक्षिण कोरिया येथे उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे तसेच आरती सोमण व डॉ. माधवी चिडगोपकर या पालकांचा विशेष सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन केतकी पुजारी व योगेश ठीक यांनी केले.