नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाने कर्नाटकातील कॉंग्रेसचे सरकार फोडाफोडी करून पाडण्याचा हास्स्यापद प्रयत्न चालवला आहे असा आरोप कॉंग्रेस पक्षाने केला आहे. भाजप नेत्यांची एक टीम पक्ष फोडण्याची ऑफर घेऊन कर्नाटकातील कॉंग्रेस आमदारांकडे जात आहे असे कॉंग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणूगोपाल यांनी म्हटले आहे.
नेता किंवा अजेंडा नसलेला पक्ष लोकांनी दिलेला जनादेश हाणून पाडण्यासाठी हास्यास्पद प्रयत्न करीत आहे ही त्यांची जुनी सवय आहे,असे वेणूगोपाल यांनी म्हटले आहे.परंतु आमचे कॉंग्रेसचे आमदार कट्टर निष्ठावंत आहेत आणि ते हे प्रयत्न हाणून पाडतील.
कर्नाटक सरकारने लोकांना दिलेल्या हमी वेगवान पद्धतीने लागू केल्याने आमच्या सरकारचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यामुळे भाजपने आपले असे हास्यास्पद प्रयत्न केले तरी त्यांना यश येणार नाही. भाजपने आधी कर्नाटकातील आपला विधीमंडळ नेता निवडावा अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली.
कॉंग्रेसचे आमदार रविकुमार गौडा यांनी भाजपचे लोक आमदारांना 50 कोटींची ऑफर देऊन संपर्क करीत असल्याचा दावा केला आहे. भाजपच्या एजंटांनी कॉंग्रेसच्या चार आमदारांशी संपर्क साधल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या संबंधातील पुरावा लवकरच समोर येईल असेही ते म्हणाले. गेल्या मे महिन्यातच कर्नाटकात कॉंग्रेसचे सरकार सत्तारूढ झाले आहे.