येरवडा – नदीसुधार प्रकल्पात अनेक त्रुटी असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. मात्र, येथील काम समाधानकारक सुरू आहे. मात्र, ते वेळेत पूर्ण करावे, अशी सुचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत बंड गार्डन परीसरातील कामाची पाहणी पवार यांनी केली. यावेळी त्यांनी या प्रकल्पाबाबत माहिती जाणुन घेत आवश्यक त्या सूचना केल्या. चारही धरणांतील पाण्याचा विसर्ग झाल्यास बंडगार्डन येथून जास्तीजास्त किती क्युसेस पाणी सोडण्यात आल्याची माहिती पवार यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतली.
अशी स्थिती उद्भवल्यास पाण्याचा प्रवाह अधिकाधिक वेगाने झाला पाहिजे. पायऱ्यावरील दगडात अंतर राहणार नाही, याकडे लक्ष द्या. या परिसरात विविध प्रकारची झाडे लावावीत. नागरिकांच्या माहितीसाठी त्यांची नावे इंग्रजीसह मराठीत लिहावीत. ज्येष्ठ नागरिकांना सुलभ सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात यावा. लहान मुलांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने विचार करण्यात करण्यात यावा, अशा सूचना पवार यांनी दिल्या. यावेळी रवींद्र बिनवडे, प्रशांत वाघमारे आदी उपस्थित होते.
पाहणी दौरा सकाळीच घेत जा…
सकाळी लवकर पाहणी दौऱ्याचे नियोजन केल्यास नागरिकांची जास्त गर्दी नसते, त्या उपक्रमाची माहिती अधिकाऱ्यांकडून सविस्तरपणे जाणून घेता येते तसेच काही सूचनाही करता येतात. इतर वेळत माझा वाहनाचा ताफा, अधिकाऱ्यांच्या गाड्यांमुळे वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना त्याचा फटका बसतो. इतरांना त्रास होणार नाही, यासाठी सकाळीच अशा पाहणी दौऱ्याचे नियोजन करत जा, अशी सूचनाही पालकमंत्री पवार यांनी केली.