Miss Universe Pakistan: पाकिस्तानातील कराची येथे राहणाऱ्या एरिका रॉबिनने (Erica Robin) गेल्या आठवड्यात ‘मिस युनिव्हर्स पाकिस्तान’चा किताब पटकावला. यानंतर ती आता पुढील महिन्यात एल साल्वाडोर येथे होणाऱ्या मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. मात्र त्या अगोदरच ती सध्या तिच्या एका कृतीने वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी पात्र ठरणारी एरिका पहिली पाकिस्तानी मॉडेल आहे. एरिकाच्या या यशाचा आनंद अनेकजण साजरा करत होते, तर पाकिस्तानातील अनेक राजकारणी आणि धार्मिक नेते एरिकावर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.
‘मिस युनिव्हर्स पाकिस्तान’ मालदीवमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि ती दुबईस्थित उगिन ग्रुपने आयोजित केली होती. या कंपनीकडे मिस युनिव्हर्स बहरीन आणि मिस युनिव्हर्स इजिप्त या फ्रँचायझी आहेत. एका संकेतस्थळाने यूजीन ग्रुपच्या हवाल्याने म्हटले आहे की, मिस युनिव्हर्ससाठी अनेक अर्ज पाकिस्तानमधून पाठवण्यात आले होते.
पाकिस्तानी पंतप्रधानांनीही या स्पर्धेला लज्जास्पद म्हटले आहे. यासोबतच ही स्पर्धा पाकिस्तानी महिलांचा अपमान आणि शोषण करणारी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. व्हिएन्ना न्यूजने एरिका रॉबिनचे (Erica Robin)वक्तव्य प्रसिद्ध केले आहे. ती म्हणाली, “पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे पण लोक विरोध का करत आहेत हे मला माहीत नाही. कदाचित हे घडत असेल कारण मी पुरुषांनी भरलेल्या खोलीत स्विम सूट घालून रॅम्पवर चालत होते.” असे तिने म्हटले आहे.
एवढेच नाही तर सर्व विरोधाला न जुमानता एरिका रॉबिन तिने काहीही चुकीचे केले नाही यावर ठाम आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करून मी कोणत्याही कायद्याचे उल्लंघन करत नाही, असे तिने म्हटले आहे. एरिका (Erica Robin)म्हणाली, “पाकिस्तानमधील रूढीवाद संपवण्यासाठी मी जोरदार प्रयत्न करत आहे.” दरम्यान, एरिका रॉबिन (Erica Robin) ही 24 वर्षांची पाकिस्तानी मॉडेल आहे, जिने बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदवी घेतली आहे. जानेवारी 2022 मध्ये तिने तिच्या व्यावसायिक मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली.