नवी दिल्ली – खलिस्तानी नेता आणि बब्बर खालसा इंटरनॅशनल या दहशतवादी संघटनेचा सदस्य करणवीर सिंग (Khalistani leader Karanveer Singh) याच्याविरोधात इंटरपोलने (Interpol) रेड कॉर्नर नोटीस (red corner notice) बजावली आहे. इंटरपोलने ही नोटीस सोमवारी आपल्या वेबसाइटवर अपलोड केली आहे.
गुप्तचरांनी दिलेल्या माहितीनुसार करणवीर सिंग सध्या पाकिस्तानमध्ये लपून बसला आहे. त्याचे मूळ गाव पंजाबमधील कपुरथळा जिल्ह्यात आहे. वेगवेगळे गुन्ह्यांचे कट, हत्या, शस्त्रास्त्र आणि स्फोटकांविषयीचे गुन्हे, दहशतवादी कारवायांसाठी निधी संकलन, घातपाती कारवायांचे कट करणे आणि दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याच्या आरोपांखाली तो भारतासाठी “वॉन्टेड’ आहे.
रेड कॉर्नर नोटीसीद्वारे इंटरपोलच्या सर्व सदस्य देशांना वॉन्टेड आरोपीला तात्पुरते ताब्यात घेण्याची सूचना देण्यात येते. संबंधित आरोपीचे कायदेशीर प्रत्यार्पण होईपर्यंत त्याला ताब्यात ठेवले जाते. इंटरपोलने यापूर्वी हिमांशू उर्फ भाऊ याच्याविरोधात देखील अशीच रेड कॉर्नर नोटीस बजावली होती. भारत सरकारने खलिस्तानी कारवायांना आळा घालण्याच्या उद्देशाने अशा संघटनांच्या सदस्यांविरोधातील कारवाई अधिक प्रमाणात करायला सुरुवात केली आहे.
रेड कॉर्नर नोटीस म्हणजे काय?
इंटरपोलची ही नोटीस गुन्हेगाराचा पत्ता मिळवून, गुन्हेगाराला तात्पुरते ताब्यात घेऊन – ज्या देशात गुन्हा घडला असेल त्या सदस्य देशाच्या पोलीसांच्या ताब्यात गुन्हेगाराला देण्यासाठी बजावली जाते.आजच्या तारखेस 188 सदस्य असलेल्या इंटरपोल या संस्थेनी आठ हजारहून अधिक गुन्हेगारांच्या प्रत्यपर्णासाठी नोटीसा बजावल्या आहेत. दुर्दैवाची गोष्ट अशी की यादीत भारतीय अग्रेसर आहेत. 2011 च्या आकडेवारीनुसार एकूण 369 भारतीय इंटरपोलच्या “लूक आउट’ नोटीस वर आहेत.
आंतरराष्ट्रीय पातळीवर गुन्हेगाराला जेरबंद करण्यासाठी काही कायदेशीर संकेत असतात. याला प्रत्यर्पण करार म्हणतात. या करारांची अंमलबजावणी अत्यंत किचकट आणि वेळखाऊ असते. त्यामुळे विजय मल्या, नदीम सैफी, ललित मोदी यांच्या सारखे आरोपी उजळ माथ्याने फिरत असतात. बऱ्याचवेळा आरोपी कुठे आहे याचा पत्ताच नसतो. अश्यावेळी इंटरपोल ही आंतरराष्ट्रीय पोलीस संस्था गुन्हेगाराला पकडण्यात मदत करते.