गुप्तचर खाते “स्कॉटलंड यार्ड’सारखे करू
नवी दिल्ली, दि. 20 – केंद्रीय गुप्तचर खात्याचा (सीबीआय) विस्तार करण्यात येऊन ब्रिटनच्या स्कॉटलंड यार्डसारखे बलशाली स्वरूप त्याला देण्यात येईल, असे गृहमंत्री चरणसिंग यांनी जाहीर केले. सीबीआय चांगले काम करीत आहे व लोकांचा तीवर विश्वास आहे.
ही गुप्तचर संस्था म्हणजे देशाची प्रतिष्ठा बनण्यासाठी सरकार जरूर त्या सर्व सोयी उपलब्ध करील. कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या जुन्या पद्धती बदलल्याच पाहिजेत. गुन्हे घडण्यास विविध गुंतागुंतीचे प्रश्न कारणीभूत असतात, असेही ते म्हणाले.
सीमाप्रश्न निश्चितपणे सोडविणार
बेळगाव – महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न केंद्र सरकार निश्चितपणे सोडवील, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री चरणसिंग यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना दिले.
अतिथी नियंत्रण कायद्यात सवलत
मुंबई – राज्य सरकारने अतिथी नियंत्रण कायद्यात सवलत जाहीर केली आहे. लग्नविधी व अंत्यसंस्कार व्यतिरिक्त इतर कार्यक्रमात 50 जणांना जेवण देण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच लग्नविधी व अंत्यसंस्कार यासाठी 100 लोकांना जेवण देण्याची परवानगी पुढेही चालू राहील.