नवी दिल्ली :- जातनिहाय गणनेच्या पाठिशी जेडीयू आणि इतर विरोधी पक्षांप्रमाणेच कॉंग्रेसही असल्याचे याआधीच स्पष्ट झाले. अशात कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी मध्यप्रदेशातील सभेत बोलताना पक्षाच्या त्या भूमिकेवर शिक्कामोर्तब केले.
मध्यप्रदेशात विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर कॉंग्रेसचे सरकार जातनिहाय गणना करेल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे आगामी निवडणुकांत विरोधी पक्ष जातनिहाय गणना हा प्रचाराचा मुद्दा बनवणार असल्याचे सूचित होत आहे.
भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार जातनिहाय गणनेस अनुकूल नसल्याचे मानले जाते. त्यामुळे भाजपची कोंडी करण्यासाठी विरोधक त्या मुद्द्याला हवा देणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. संबंधित मुद्दा लावून धरल्यास राजकीय लाभ मिळेल, असा विरोधकांचा कयास आहे.