13 ऑगस्ट रोजी आचार्य अत्रे साहित्य संमेलन
सासवड – येथे 1998 पासून आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी रौप्यमहोत्सवी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आचार्य अत्रे यांच्या जन्मदिनी रविवारी (दि. 13) सासवड नगरपालिकेच्या आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते व महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखेचे अध्यक्ष ऍड. अण्णासाहेब खाडे यांनी दिली.
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सागर देशपांडे संमेलनाचे अध्यक्ष आहेत. आचार्य अत्रे यांचे नातू अभिजित अत्रे स्वागताध्यक्ष आहेत. समारंभाच्या दिवशी सायंकाळी निमंत्रित कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. रस्ते विकास महामंडळ मुंबई चे अतिरिक्त आयुक्त अनिलकुमार गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रसिद्ध कवी व गीतकार बाबासाहेब सौदागर हे या कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी आहेत.
सोमवारी (दि. 14) आज आचार्य अत्रे हवे होते हा परिसंवाद, प्रसिद्ध निवेदिका प्रस्तुत अष्टपैलु आचार्य अत्रे हा दृक श्राव्य सांगीतिक मेजवानीचा कार्यक्रम व दुपारी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. दुपारी 4 वाजता संमेलनाच्या समारोपासाठी ज्येष्ठ साहित्यिक रघुराज मेटकरी प्रमुख पाहुणे असून संमेलनाध्यक्ष डॉ. सागर देशपांडे अध्यक्षीय समारोप करतील.