‘परिसर’ संस्थेकडून चार शहरांत सर्वेक्षण
पुणे – अपघातापासून बचावासाठी चालक, सह प्रवासी तसेच मागे बसलेल्या प्रवाशांसाठी चारचाकी वाहनांत सीट बेल्टची सुविधा असते. सर्वेक्षणानुसार 100 पैकी केवळ 67 टक्के चालकच याचा वापर करीत असल्याचे समोर आले आहे.
“परिसर’ या संस्थेकडून पुणे, नागपूर, कोल्हापूर आणि औरंगाबाद या चार शहरांमधील 20 ठिकाणी वाहनचालकांचे फोटोसह सर्वेक्षण करण्यात आले. यातून सदर बाब समोर आली आहे. मात्र, सीट बेल्टचा वापर करण्यात पुणे शहरातील वाहन चालक अग्रेसर ठरले आहेत. पुण्यातील 76 टक्के वाहन चालक नियमित सीट बेल्ट वापरत असल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले आहे. उर्वरीत 3 शहरांमध्ये केवळ 28 टक्केच वाहनचालक सीट बेल्ट वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे.
का करण्यात आले सर्वेक्षण?
देशभरात झालेल्या अपघातात शासकीय आकडेवारीनुसार 2017 ते 2021 या कालावधीत सीट बेल्ट न लावल्याने 89 हजार जणांचा मृत्यू झाला, तर 2 लाख 59 जण जखमी झाले. महाराष्ट्रात याच कालावधीत सीटबेल्ट न लावल्यामुळे 6115 जणांचा मृत्यू तर 14 हजार 844 जण जखमी झाले. यात 45 टक्के घटनांत वाहनचालकांचा मृत्यु झाला तर 55 टक्के प्रवासी जखमी झालेले आहेत. सीट बेल्ट बाबत असलेली जनजागृती तसेच प्रत्यक्षातील वापर याची माहिती घेण्यासाठी चार शहरांत 20 वर्दळीच्या चौकात हे सर्वेक्षण एप्रिल ते जून या तीन महिन्यांत करण्यात आले. यामध्ये एकूण 6 हजार 827 वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यात, सुमारे 11 हजार 300 प्रवासी होते.
सीट बेल्ट वापरात पुणे आघाडीवर…
सीट बेल्ट वापरात पुणे आघाडीवर असल्याचे या सर्वेक्षणात समोर आले आहे. पुण्यातील 76 टक्के वाहनचालक सीट बेल्ट वापरतात. तर इतर तीन शहरांमध्ये केवळ 28 टक्केच वाहनचालक सीट बेल्ट वापरताना आढळले आहेत. या शिवाय, एकूण सर्वेक्षणात 16 टक्के सह प्रवासी सीट बेल्ट वापरत असून 1 टक्के पेक्षाही कमी प्रमाणात मागील सीट वर बसलेले प्रवासी सीट बेल्ट वापरत असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे.
सीट बेल्ट वापरणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, आम्ही केलेल्या सर्वेक्षणात फारच कमी वाहनचालक आणि सहप्रवासी सीट बेल्ट वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीने वारंवार राज्य व केंद्रशासित प्रदेशांना सीटबेल्ट वापराबाबत विचारणा केली आहे. त्यामुळे याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे.
– रणजित गाडगीळ, संचालक, “परिसर’ संस्था