सेऊल (दक्षिण कोरिया) – अमेरिकेने आपली अण्वस्त्रवाहू पाणबुडी दक्षिण कोरियाच्या समुद्रामध्ये तैनात केली आहे. गेल्या चार दशकांमध्ये दक्षिण कोरियाच्या समुद्रात अमेरिकेची अण्वस्त्रसज्ज पाणबुडी प्रथमच तैनात करण्यात आली आहे.
उत्तर कोरियाकडून घातक अण्वस्त्रांचा वापर केला जाण्याची शक्यता लक्षात घेऊन अमेरिकेने ही पाणबुडी दक्षिण कोरियाच्या समुद्रामध्ये तैनात केली आहे.
उत्तर कोरियाने कोणत्याही घातक अस्त्रांचा आक्रमणासाठी वापर केल्यास होणारा संघर्ष हा उत्तर कोरियाला संपवून टाकेल, अशा शब्दांमध्ये इशाराही देण्यात आला आहे.
उत्तर कोरियाकडून वारंवार होणाऱ्या क्षेपणास्त्र चाचण्यां आणि वाढत्या आण्विक हल्ल्याचा धोकालक्षात घेता अमेरिकेकडून क्षेपणास्त्रवाहू पाणबुड्या दक्षिण कोरियाच्या समुद्रात वारंवार तैनात केल्या आहेत.
यासाठी अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांमध्ये एप्रिलमध्ये करारदेखील झाला आहे. त्यांनी द्विपक्षीय आण्विक सल्लागार गट स्थापन करण्यास आणि लष्करी सरावांचा विस्तार करण्यासही सहमती दर्शविली आहे.