वॉशिंग्टन – सामान्य नागरिकांच्या अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांची पूर्तता होणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामध्येही माणसाला जगण्यासाठी अन्नाची सर्वात जास्त गरज असते. पण आता संयुक्त राष्ट्रसंघाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका ताज्या अहवालाप्रमाणे जगातील तब्बल 73 कोटी 50 लाख लोक अन्नापासून वंचित आहेत.
दररोजची भूक भागण्यासाठी दररोज जेवढे अन्न आवश्यक आहे तेवढे अन्न त्यांना मिळू शकत नाही असे या अहवालात म्हटले आहे. ही स्थिती अशीच कायम राहिली तर 2030 पर्यंत जगातील 60 कोटी पेक्षा जास्त लोकांना कुपोषणाची समस्या जाणवू शकेल असा इशाराही या अहवालात देण्यात आला आहे.
स्टेट ऑफ फुड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन इन द वर्ल्ड 2022 असे या अहवालाचे नाव असून त्यामध्ये जगातील सर्वच देशांमधील परिस्थितीचा विचार करण्यात आला आहे. 2019 नंतर जगाच्या पाठीवरील अनेक देशांमधील लोकांना अन्न मिळवण्यासाठी जास्त संघर्ष करावा लागला असे या अहवालात म्हटले आहे. एखाद्या व्यक्तीला जेव्हा दिवसात अजिबात जेवणासाठी अन्न किंवा आहार उपलब्ध होत नाही तेव्हा अशा माणसांची नोंद अन्नापासून वंचित असणाऱ्या माणसांमध्ये केली जाते.
गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये दररोज एक वेळेसही अन्न उपलब्ध न होणाऱ्या अशा लोकांची संख्या 73 कोटी पेक्षा जास्त झाली आहे. अहवालात दिलेल्या माहितीप्रमाणे जगातील सुमारे 30% म्हणजे 240 कोटी लोकसंख्येला सातत्याने अन्नपुरवठाही होत नाही. म्हणजेच त्यांची अन्नाची गरज दररोज भागली जातेच असे नाही.
एकूण लोकसंख्येच्या 42 टक्के लोकसंख्येला म्हणजेच 310 कोटी लोकसंख्येला पौष्टिक आहार उपलब्ध झाला नाही असे या अहवालात म्हटले आहे. 2022 या एका वर्षामध्ये पाच वर्षापेक्षा कमी वय असलेल्या साडेचार कोटी मुलांना कुपोषणाची समस्या जाणवत होती. करोना महामारीमुळे निर्माण झालेली आर्थिक टंचाईची परिस्थिती आणि विविध कारणांमुळे वाढलेली महागाई ही सर्वसामान्य लोकांना अन्नापासून वंचित ठेवण्याची महत्त्वाची कारणे मानण्यात येतात.