नवी दिल्ली – भाजप नेत्या पंकजा मुंडे कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पंकजा यांनी काही दिवसांपूर्वीच कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. त्यांनी यासाठी दोनवेळा दिल्ली दौरे केल्याचेही वृत्त आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील बंडखोरीनंतर आता राज्याच्या राजकारणात आणखी एक स्फोट होण्याची शक्यता आहे.
पंकजा मुंडे भाजपच्या बड्या नेत्या आहेत. त्या भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. पण सध्या त्या नाराज आहेत. पक्षातील ज्येष्ठ नेते त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा आपली वेगळी वाट निवडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
पंकजा मुंडे यांनी कॉंग्रेस वरिष्ठांच्या घेतलेल्या भेटीला कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनीही दुजोरा दिला आहे. पंकजांनी या भेटीत पक्ष प्रवेशाच्या मुद्यावर विस्तृत चर्चा केली. सांगलीच्या एका बड्या नेत्याकडून पंकजा मुंडेंसाठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नाना पटोलेंचे कानावर हात
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या प्रकरणी आपल्या कानावर हात ठेवले आहेत. पंकजा मुंडेंच्या कॉंग्रेस प्रवेशासंबंधीची मला कोणतीही माहिती नाही. पण पंकजाताई कॉंग्रेसमध्ये येणार असतील, तर त्यांचे स्वागतच आहे, असे ते म्हणाले. विशेष म्हणजे कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी काही दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे यांना कॉंग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती. पंकजा मुंडे या आमच्या भगिणी आहेत. त्यांच्यावर अन्याय होत आहे. यामुळे त्यांच्या मनात अन्यायाची भावना निर्माण झाली असून, त्यातूनच त्यांनी भाजप आपला पक्ष नसल्याचे विधान केले आहे. भाजपच्या उभारणीत त्यांच्या कुटुंबाचे मोठे योगदान आहे. त्यांच्यासाठी कॉंग्रसचे दरवाजे कायम खुली आहेत, असे थोरात म्हणाले होते.