कराड – जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या “पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा’ या ओवीप्रमाणे मुलाची कीर्ती इतकी पसरायला हवी, की त्याचे नाव सर्वत्र गाजले पाहिजे. त्याचप्रमाणे सुसंस्कारी आई-वडिलांच्या पोटी जन्म घेऊन त्यांचे संस्कार, आदर्श, विचार आणि मार्गदर्शनाच्या जोरावर एक सुसंस्कारी व्यक्तिमत्व म्हणून नावलौकिक मिळवण्याबरोबरच राजपत्रित अधिकारी म्हणून आई-वडिलांसह स्वतःचे नाव सर्वत्र गाजवण्याची कामगिरी प्रकाश मोहिते यांनी आपल्या अथक प्रयत्नांतून साधली आहे.
– राजेंद्र मोहिते
महाराष्ट्र लोकसेवा आयोगतर्फे घेण्यात आलेल्या कृषी मंडल अधिकारी (राजपत्रित अधिकारी वर्ग 2) म्हणून प्रकाश मोहिते यांची नुकतीच अभिनंदनीय निवड झाली आहे. त्यांचे वडील कै. बाळासाहेब मोहिते हे एका शेतकरी कुटुंबातील सुस्वभावी व मनमिळावू व्यक्तिमत्व. लोकांच्या मदतीसाठी नेहमी प्रयत्नशील. कृष्णा सहकारी बॅंकेमध्ये ते अधिकारी होते.
तर आई कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या माजी संचालिका होत्या. या दोघांचा सुसंस्कृतपणा, संस्कार, आचार, विचार आणि आदर्श मुलांमध्येही उतरलेत. “शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी’ या तुकोबांच्याच ओवीप्रमाणे चांगल्याच्या पोटी चांगलचं येतं. तसे, प्रकाश मोहिते यांच्यासह त्यांचे वडील बंधू विकास मोहिते आणि दोन्ही बहिणी यांनीही आई-वडिलांचे आदर्श जोपासले आहेत, ही कौतुकाचीच बाब आहे.
शेतकरी कुटुंबाचा वारसा असलेल्या प्रकाश मोहिते यांनी करोना व लॉकडाऊन काळात त्यांच्या वडील बंधूंना शेतीत मदत करत मलकापूर (कराड) येथे त्यांच्या मित्राला सोबत घेवून स्वतःचा कृषी खतांचा व्यवसायही सुरू केला. तसेच आपल्या कौशल्याचा योग्य वापर करून शेतीचे उत्पन्न वाढवण्यावर भर दिला. इतरही शेतकऱ्यांना आपल्यासोबत घेत त्यांनाही अधिकाधिक उत्पन्न घेण्याबाबत मोलाचे मार्गदर्शही केले.
दरम्यान, मोहिते यांनी 2022 मध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा दिली. तर ऑक्टोंबर महिन्यात राज्यसेवा मुख्य परीक्षा दिली. त्यांनतर 11 एप्रिल 2023 रोजी मुलाखत दिली. नुकताच 7 जून रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये प्रकाश मोहिते यांची राज्यसेवा कृषी अधिकारी वर्ग 2 पदी निवड झाली. या निकालानंतर वडिलांचे स्वप्न सत्यात उतरवण्यात यश आल्याने प्रकाश मोहिते यांच्यासह त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवाराचाही आनंद गगनात मावेनासा झाला.
प्रकाश यांचे वडील बंधू सामाजिक कार्यकर्ते, शिवप्रेमी विकास मोहिते हे नेहमीच सामाजिक कार्यात सक्रिय असतात. गावातील शालेय विद्यार्थ्यांना विविध शालोपयोगी साहित्य वाटप करणे, गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन त्यांचा गौरव करणे, सरसेनापती हंबीरराव मोहिते व्याख्यानमालेचे संयोजक, युवकांमध्ये विचार चळवळ वाढवणे आदींमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. याबरोबरच प्रगतशील शेती करण्यावरही त्यांचा भर असून त्यांच्या कष्टाला व प्रयत्नांना प्रकाश मोहिते यांच्या मार्गदर्शनाची योग्य जोड मिळाली आहे. तर प्रकाश यांना विकास यांची खंबीर साथ मिळाल्याने त्यांनीही आपल्या यशातून आकाशाला गवसणी घातली आहे.
प्रकाश मोहिते यांचे प्राथमिक शिक्षण बेलवडे बुद्रुक, ता. कराड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. तर पाचवी व सहावी पर्यंतचे माध्यमिक शिक्षण गावातीलच कासेगाव शिक्षण संस्थेच्या ब्रह्मदास विद्यालयात झाले. पुढे सातवी ते दहावी विश्वास विद्यानिकेतन – शिराळा, अकरावी, बारावी कृषी महाविद्यालय – फलटण, बीएससी ऍग्री पदवी रत्नाई कृषी महाविद्यालय – अकलूज, तर एस्सी बायोटेकची पदवी कृष्णा महाविद्यालय – कराड येथून संपादन केली.
दरम्यान, शिक्षण चालू असतानाच त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम सुरू केला. राहुरी व पुणे येथे त्यांनी तब्बल सहा वर्ष स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची तयारी केली. त्यानंतर करोना व लॉकडाऊनमध्ये गावी येत त्यांनी घरी बसूनच स्पर्धा परीक्षेचे स्वतःचे वेळापत्रक तयार केले. अभ्यासक्रमाचा सूक्ष्म अभ्यास करून वेळेचे योग्य नियोजन, वाचन, स्पर्धा परीक्षेचे विविध व्हिडिओ पाहणे, ऑनलाईन चर्चासत्र व सेमिनारमध्ये सहभाग, यशस्वी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आदींच्या माध्यमातून त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. या सगळ्या अथक परिश्रमानंतर एक राजपत्रित अधिकारी म्हणून त्यांना मिळालेले यश लाख मोलाचे ठरले. या प्रवासात वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रकाश मोहिते यांना आई, वडील बंधू, वहिनी, दोन्ही बहिणी आणि दाजी यांनी धीर दिला. तसेच सर्वच कुटुंब ठामपणे पाठीशी उभे राहिल्यानेच हे यश संपादन करता आल्याचे प्रकाश मोहिते यांनी सांगितले.
बुद्धीमत्तेला संयमाची जोड
स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अनेकविध अडचणींचा सामना करावा लागला. त्यासाठी जवळपास दहा वर्षे खर्ची घातली. दरम्यान, दोन-तीन वेळा चार-दोन गुणांनी यशाला हुलकावणी दिली. परंतु, या अपयशाने खचून न जाता जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाच्या जोरावर मनाला नव्याने उभारी देत पुन्हा श्रीगणेशा केला. स्वतःच्या बुद्धीमत्तेवर विश्वास ठेवत परिश्रमाला संयमाची जोड दिल्यानेच हे यश मिळाल्याचे प्रकाश मोहिते यांनी सांगितले. त्यांचा हा ध्येय्याचा यशस्वी पाठलाग कौतुकास्पद व अभिमानास्पद असल्याचे मत त्यांना शुभेच्छा देणाऱ्या पत्येकाने व्यक्त केले.
शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असल्याने आई-वडिलांचे आदर्श, वडील बंधूंची खंबीर साथ, याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती, त्यांच्यावर ओढवणारे आस्मानी संकट आदींची मला जान आहे. माझे यश आई-वडिलांना समर्पित असून त्यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून “शेतकरी हितायं, शेतकरी सुखायं’ याप्रमाणे आपली सेवा बजावणार.
– प्रकाश मोहिते (मंडल कृषी अधिकारी).