पुणे – महाराष्ट्राच्या कला व संस्कृतीचा अविभाज्य भाग बनलेल्या झपूर्झा कला व संस्कृती संग्रहालयातर्फे झपूर्झा उत्सवाची घोषणा झाली आहे. खडकवासला धरणाजवळील कुडजे येथील ‘झपूर्झा’च्या वास्तूत उत्सव होत असून, यात संगीत, नाटक, अभिवाचन, शास्त्रीय गायन, विविध कार्यशाळा आदी कार्यक्रम होणार आहेत.
पीएनजी सन्स व झपूर्झाचे संस्थापक अजित गाडगीळ उत्सवाबाबत म्हणाले, की संग्रहालयाची वर्षपूर्ती, जागतिक संग्रहालय दिवसाच्या (१८ मे) औचित्याच्यानिमित्तीने झपूर्झा उत्सव १३, १४ मे व १८, १९, २० व २१ मे रोजी होत आहे. उत्सवाच्या काळात सकाळी १२ पासून कलाप्रेमी व रसिकांनी ललित कला, चित्र, शिल्प व अन्य कला तसेच, कार्यशाळांचा आस्वाद घेता येईल.
उत्सवात राहुल देशपांडे, प्रल्हाद सिंह टिपणिया, व्यंकटेश कुमार, वैभव जोशी, सावनी शेंडे, हिमांशू श्रीवास्तव, तेजस व राजस उपाध्ये, अमित वेणू आदींचे सादरीकरण होणार आहे. चैत्राली माजगावकर यांचे पपेट मेकिंगवर, अनिकेत अंबवले यांचे झेंबे वादन, घनश्याम देशमुख यांचा बोलक्या रेषा आदी कार्यशाळा होणार आहेत.
रघुराज देशपांडे भारतीय रंगावली साकारणार आहेत. गिरीश कुलकर्णी, विभावरी देशपांडे व चंद्रकांत काळे हे ‘आज या देशामध्ये’ या कार्यक्रमाअंतर्गत अभिवाचन करणार आहेत. तसेच, चित्रकथीचे सादरीकरण अभिषेक दुखंडे, चलता फिरता बँड सुफी संगीत सादर करणार आहे. याबरोबर प्रिंट मेकिंग, ग्लास पेटिंग आदी कार्यशाळा येथे होतील. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व वयोगट लक्षात घेऊन उत्सवातील कार्यक्रम व कार्यशाळा आयोजिल्या आहेत, असे गाडगीळ यांनी सांगितले.
नव्या ठेव्यांची भर
जागतिक संग्रहालय दिनानिमित्त १८ मे रोजी झपूर्झा येथे प्रवेश विनामूल्य आहे. तसेच, वर्षपूर्तीनिमित्त ग्लास पेटिंग, पोथी (भारतीय हस्तलिखिते), महाराष्ट्र स्कूल आदीच्या नवीन गॅलरी येथे पाहता येतील. कार्यक्रमांची संपूर्ण माहिती ‘झपूर्झा’च्या सोशल मीडिय पेज व https://zapurza.org/ वर उपलब्ध आहे.