मुंबई – बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने कमी कालावधीतच सिनेसृष्टीत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याच्या दमदार अभिनयामुळे त्याचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. कार्तिकचे चाहते त्याच्या नव्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र नुकतेच त्याने सोशल मीडियावर त्याच्या आईबाबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे.
कार्तिकची आई माला तिवारी या गेल्या काही दिवसांपासून ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत होत्या. मात्र आता त्याच्या आईने कॅन्सरवर मात केली आहे. आईसोबतचा एक फोटो इनस्टाग्रामवर शेअर केला आहे. ही पोस्ट करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘काही काळापूर्वी बिग सी – ‘कॅन्सर’ आमच्या आयुष्यात आला आणि त्याने आमच्या कौटुंबिक जीवनात अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आम्ही हतबल होतो, पण माझ्या आईने एका शूर सैनिकाप्रमाणे त्याचा सामना केला. तिच्या जिद्दीने कधीही हार मानली नाही. आम्ही अंधारावर विजय मिळवला. तुमच्या कुटुंबाच्या प्रेम आणि पाठिंब्यापेक्षा मोठी कोणतीही गोष्ट नसते.”
कार्तिकच्या या पोस्टवर अनेक बॉलीवूड कलाकरांनी कमेंट केली आहे. अनुपम खेर यांनी ‘जय माता दी’ अशी कमेंट केली आहे. याशिवाय आयुष्मान खुराना, सान्या मल्होत्रा, विकी कौशल, कपिल शर्मा आणि सोनाली बेंद्रेनेही कार्तिक आर्यनच्या पोस्टवर कमेंट केली आहे.
View this post on Instagram
दरम्यान, कार्तिकच्या ‘भूल भुलैया 2’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात आर्यनसह अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरला होता. मात्र कार्तिकचा 17 फेब्रुवारी 2023 रोजी रिलीज झालेला ‘शहजादा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. मात्र आता लवकरच कार्तिकचा ‘सत्यप्रेम की कथा’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याशिवाय ‘भूल भूलैय्या-3’ मध्येही आर्यन दिसणार असल्याची चर्चा आहे.