पुणे -ग्रामीण भागासह, दाट लोकवस्ती असलेल्या भागात चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा मिळावी, या उद्देशाने केंद्र शासनाने 15 व्या वित्त आयोगाअंतर्गत शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांना निधी मंजूर केला आहे. या निधीतून अनेक भागांत 2019 पासून आरोग्य वर्धिनी केंद्रही उभारण्यात आलेली आहेत. मात्र, आता या आरोग्य वर्धिनी केंद्रामध्येच राज्य शासन हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करणार आहे.
नुकत्याच झालेल्या राज्याच्या अंदाजपत्रकात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्याची घोषणा केली होती. तर या योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 1 मे रोजी करायचे असल्याने आरोग्य वर्धिनी केंद्राचे रूपांतर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यामध्ये करण्याचे आदेश आरोग्य विभागाने पुणे, सोलापूर, सातारा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच पुणे विभागातील महापालिकांनाही हे आदेश देण्यात आले आहेत.
तीन दिवसांत काम पूर्ण करा
शासनाने दिलेल्या आदेशात संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थानी 15 एप्रिलपूर्वी आरोग्य वर्धिनी केंद्राचे आपला दवाखान्यात रूपांतर करण्याचे आदेश काढले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हे आदेश 12 एप्रिल रोजी काढण्यात आले आहेत. त्यामुळे तीन दिवसांत या आदेशाची अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थांना करायची आहे. 1 मे पूर्वी सर्व यंत्रणा कार्यान्वित करायची असल्याने अधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे. मात्र, या प्रकारामुळे राज्य शासन केंद्राच्या योजनेतच आपली योजना घुसवत आहे.
दवाखान्यात या मिळणार सुविधा
दुपारी 2 ते
रात्री 10 पर्यंत वेळ
मोफत उपचार
मोफत प्रयोगशाळा
तपासणी
टेली कन्सलटेशन
गर्भवतींची तपासणी
लसीकरण
महिन्यातून एकदा नेत्रतपासणी
बाह्य यंत्रणेमार्फत रक्त तपासणी
मानसिक आरोग्यासाठी समुपदेश सेवा