वातावरणातील बदलाने धोका ः 5 ते 15 वयोगटातील मुलांना संसर्गाचा त्रास अधिकप्रभात वृत्तसेवा
पुणे – वातावरणातील बदल आणि नवनवीन विषाणूंच्या प्रादुर्भामुळे लहान मुले आजारी पडण्याची संख्या वाढल्याचे दिसून येते आहे. याआधी इन्फ्लुएंझाचे रुग्ण सापडत होते. मात्र, आता ऍडिनोव्हायरस आणि राइनोव्हायरस या दोन विषाणूंचे रुग्णही आढळत आहेत. त्यामध्ये “ऍडिनोव्हायरस’ची रुग्णसंख्या अधिक आहे. यामध्ये मुलांना ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास अधिक आढळून येत आहे, असे निरीक्षण डॉक्टरांकडून नोंदवले जात आहे.
शहरात सध्या साधारणपणे 5 ते 15 या वयोगटातील मुलांमध्ये व्हायरसचा प्रादुर्भाव अधिक जाणवत आहे. ताप येणे, टॉन्सिल्स, घसा खवखवणे आणि डोळे लाल होणे अशा तक्रारींमध्ये अचानक वाढ झाल्याने डॉक्टरांकडे गर्दी वाढली आहे. साधारणपणे आजारी असलेल्या 70 टक्के मुलांमध्ये “ऍडिनोव्हायरस’ची लक्षण दिसून आले आहेत, असे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहे. मुलांच्या प्रकृतीमध्ये काहीही बदल दिसल्यास किंवा त्यांच्या प्रकृतीत काही बिघाड जाणवल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
थंड आणि कफ निर्माण करणारे पदार्थ टाळावेत. तर, कोणताही ताप दोन ते तीन दिवसांपेक्षा जास्त वेळ असेल, शिवाय बाळाला श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर स्वतः औषधे न घेता त्वरीत डॉक्टरांचा सल्ल्याने उपचार सुरू करावेत, अशा सूचना डॉक्टर
देत आहेत.
डॉक्टर म्हणातात…
सध्या रुग्णालयात दाखल झालेल्या प्रत्येक मुलाचे स्वॅब एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविण्यात येते. इन्फ्लुएंझावर लस आहे, मात्र ऍडनोव्हायरस आणि राईनोव्हायरसवर लस उपलब्ध नाही. पण, या संसर्गाचे रुग्ण तीन ते चार दिवसात बरे होतात. मात्र, लक्षणे दिसल्यास मुलांना तातडीने उपचार द्यावेत. जन्मत: हृदयाचा त्रास, कमी वजन असलेली, यांसह प्रतिकारशक्ती कमी असलेल्या मुलांना या विषाणूची अधिक लागण होते, असे बालरोगतज्ज्ञ डॉ. सागर लाड यांनी केले आहे.
काय आहे ऍडिनोव्हायरस?
ऍडिनोव्हायरस हा एक विषाणू आहे जो श्वसननलिका, आतडे, डोळा, मूत्रमार्गात वाढतो. या विषाणूमुळे न्यूमोनिया, पचनाचे आजार आणि लघवी संसर्ग होऊ शकतो. ऍडिनोव्हायरस विशेषतः धोकादायक आहे आणि त्यामुळे न्यूमोनियासह मोठ्या श्वसनाच्या गुंतागुंत होऊ शकतात. ऍडिनोव्हायरसमुळे मृत्यू होत नाही. ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे अशा मुलांवर याचा जास्त प्रमाणात परिणाम होतो.
+++++++