पुणे -तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाची खातरजमा न करता हडपसर येथील वनजमीन संबंधित अर्जदाराला प्रदान करणे, करोना काळात जीवनावश्यक वस्तूची खरेदी आणि आवश्यक सेवासुविधा यांमध्ये आर्थिक अनियमितता, पुणे शहरच्या तहसीलदार असताना नियमबाह्य कामकाज आणि निवडणूकविषयक कामकाजाबाबत प्राप्त गंभीर तक्रारींचा ठपका ठेवून हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले किरण सुरवसे यांची हवेली तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश राज्य शासनाचे अवर सचिव संजीव राणे आणि डॉ. माधव वीर यांनी जारी केले.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी 2 फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या अहवालानुसार, कोलते यांनी हडपसर येथील सर्वेक्षण क्रमांक 62 या जमिनीबाबतच्या तत्कालीन महसूल मंत्री यांच्या आदेशाची खातरजमा न करता तसेच शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय जिल्हाधिकारी यांचे अभिप्राय, आदेश प्राप्त न करता कार्यकक्षेच्या बाहेर जाऊन संबंधित अर्जदारास राखीव वन संवर्गातील जमीन प्रदान केल्याचा आदेश 12 जुलै 2021 रोजी दिला होता.
तसेच विभागीय आयुक्त राव यांच्या 23 मे रोजीच्या अहवालात कोलते यांनी करोना काळात जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना आणि आवश्यक सेवासुविधा प्राप्त करून घेताना उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या शासन निर्णयातील तरतुदींचा अवलंब न करता वित्तीय अनियमितता केल्याचे निदर्शनास आले. तसेच पुणे शहरच्या तहसीलदार असताना प्रकाश बिजलानी व इतर यांच्या प्रकरणात नियमबाह्य पद्धतीने कामकाज केले. याशिवाय कोलते यांच्याविरुद्ध निवडणूकविषयक कामकाजाबाबत गंभीर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे कोलते यांना निलंबित केल्याचे आदेशात नमूद केले आहे.