नगर – पालिका कर्मचारी तसेच माजी नगरसेवक बाबासाहेब मुदगल यांचे बांधकाम अतिक्रमण व अनधिकृत ठरवून ते पाडण्याचा आदेश महापालिकेच्या उपायुक्तांनी दिला आहे. या अतिक्रमण विरोधातील तक्रारदार ऍड. गजेंद्र दांगट यांच्या लढ्याला अखेर यश आले.
पालिका कर्मचारी बाबू मुदगल व मुदगल कुटुंबीय यांनी सि.स. नं. 7499 आणि 6052 या जागेवर कोणतीही परवानगी न घेता तीन मजली आरसीसी बांधकाम केले. या इमारतीमध्ये त्यांनी अवैधरित्या भाडेकरी टाकले होते.
तर महापालिकेची मोठ्या प्रमाणात घरपट्टी बुडवून त्यापुढील येण्या-जाण्याच्या रस्त्यात मोठ्या आकाराचा ओटा बांधून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याची तक्रार ऍड. गजेंद्र दांगट यांनी मनपाकडे केली होती. याप्रकरणी उपायुक्तांकडे सुनावणीत मुदगल कुटुंबीयांनी अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम केल्याचे सिद्ध झाले. मुदगल कुटुंबीयांनी स्वतःहून सर्व बांधकाम काढून घ्यावे, अन्यथा ते पाडण्यात येईल, असा आदेश उपायुक्तांनी दिला आहे.