प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 29 –महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 34 गावांतील बहुतांश प्रभागांमध्ये तीनपैकी दोन जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. त्यामुळे या गावांचे प्रतिनिधी म्हणून महापालिकेची पायरी चढण्यासठी आसुसलेल्या कारभाऱ्यांऐवजी त्यांच्या कारभारीनी शहराचा कारभार पाहण्यासाठी महापालिकेत जाणार आहेत. निवडणूक आयोगाकडून काढण्यात आलेल्या ओबीसी आरक्षणाच्या सोडतीनंतर हे चित्र स्पष्ट झाले असून, या गावांमधून नगरसेविका होणाऱ्या महिलांची संख्या जास्त असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सन 2017 मध्ये महापालिकेची हद्दवाढ करत शासनाने 11 गावे पालिकेत समाविष्ट केली. त्यानंतर मागील वर्षी आणखी 23 गावे पालिकेत समाविष्ट करण्यात आली. प्रभाग रचनेत ही गावे जुन्याच प्रभागांना जोडून मोठ्या आकाराचे प्रभाग करण्यात आले असले तरी शहराच्या पूर्वेकडील तसेच दक्षिणेकडील गावांसाठी बहुतांश प्रमाणात स्वतंत्र प्रभाग झाले आहेत. त्यामुळे आधी गावकीचे राजकारण सांभाळणाऱ्या गावातील पुढाऱ्यांनी महापालिकेत जाण्याची तयारी केली होती. मात्र, आता ओबीसी आरक्षण आणि सर्वसाधारण गटातून पडलेल्या महिला आरक्षणामुळे या गावांमधून बहुतांश महिलांना संधी मिळणार आहे.
असे आहे गावांतील आरक्षण
प्रभाग 3 लोहगाव विमाननगरमध्ये तीनही जागांवर आरक्षण पडले आहे. त्यात 1 जागा अनुसूचित जाती महिला, तर एक जागा सर्वसाधारण गटातून महिलेसाठी राखीव आहे. प्रभाग 4 पूर्व खराडी-वाघोली प्रभागत महिलांसाठी दोन जागा राखीव आहेत. प्रभाग 44 फुरसुंगीमध्ये तीनमध्ये एक जागा ओबीसी महिला आणि एक जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. प्रभाग 46 महंमदवाडी-उरुळी देवाचीमध्ये तीनमध्ये दोन जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. तर प्रभाग 47 कोंढवा-बुद्रूक येवलेवाडी, प्रभाग 53 खड्कवासला नऱ्हे, प्रभाग 57 कात्रज-गोकुळनगर या प्रभागांतही महिलांसाठी प्रत्येकी 2 जागा आरक्षित झाल्या आहेत.तर प्रभाग 13 बाणेर-सुस-म्हाळूंगे या गावातही एक जागा ओबीसी महिला आरक्षित झाली आहे.