फलटण -विडणीतील शेतकरी व व्यावसायिकाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दिगंबर आगवणे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. आयुर मल्टीपर्पज निधी लिमिटेडच्या माध्यमातून दामदुप्पट, तिप्पट व चौपट परतावा देतो म्हणून, विडणी, ता. फलटण येथील मोहन लक्ष्मण खरात (वय 40) यांच्याकडून 30 लाख एक हजार रुपयांच्या ठेवी विविध माध्यमातून स्वीकारल्या. गुंतवणुकीच्या परताव्यापोटी फक्त तीन लाख 60 हजार रुपये दिले आणि परताव्याची मागणी केल्यावर ऍट्रॉसिटीची केस दाखल करण्याची धमकी दिल्याची तक्रार फलटण शहर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे.
याप्रकरणी दिगंबर आगवणे, सौ. जयश्री आगवणे व संतोष आगवणे यांच्यावर भादंवि 1860 व महाराष्ट्र ठेवीदारांचे (वित्तीय संस्था) अधिनियम 1999 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विडणीतील मोहन खरात हे शेती व्यवसाय आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. त्यांची मोबाइल शॉपीसुद्धा होती.
खरात यांची पत्नी शिलाई काम करत असल्याने त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली होती. याची माहिती दिगंबर आगवणे यांना होती. खरात यांच्या घरी त्यांचे जाणे-येणे होते. आयुर मल्टीपर्पज निधी लिमिटेड ही बहुउद्देशीय गुंतवणूक संस्था आहे. बऱ्याच लोकांनी त्यात पैसे गुंतवले आहेत.
तुम्हीसुद्धा पैसे गुंतवल्यास आम्ही दामदुप्पट, तिप्पट व चौपट परतावा देतो, असे आगवणे यांनी खरात यांना सांगितले. या संस्थेचे कामकाज स्वत: व आपली पत्नी सौ. जयश्री आगवणे व संतोष आगवणे पाहत असल्याचेही दिगंबर आगवणे यांनी खरात यांना सांगितले.
त्यामुळे आगवणे यांच्यावर विश्वास ठेवून खरात यांनी विविध माध्यमातून 30 लाख एक हजार रुपयांची गुंतवणूक त्या संस्थेत केली. मात्र, परताव्या पोटी आगवणे यांनी खरात यांना फक्त तीन लाख 60 हजार रुपये दिले. पैशाची मागणी केल्यावर ऍट्रॉसिटीची केस दाखल करण्याची धमकी दिली.