नवी दिल्ली – येत्या 1 एप्रिल 2022 पासून 100 टक्के शाळा उघडण्याच्या दिल्ली सरकारच्या आदेशाला आव्हान देणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली. मुलांच्या पुर्ण उपस्थितीत या शाळा 1 एप्रिल पासून सुरू होणार आहेत.
प्रभारी मुख्य न्यायमूर्ती विपिन सांघी आणि न्यायमूर्ती नवीन चावला यांच्या खंडपीठाने मंगळवारी ही याचिका फेटाळून लावत म्हटले आहे की, आमच्या मते पालक त्यांचे पाल्य शाळेत पाठवण्यास इच्छुक आहेत.
याचिकाकर्ते वकील अरविंद कुमार पांडे,यांनी आपल्या याचिकेत म्हटले होते की, ज्यांना लसीकरण केले जात नाही अशा 4-12 वयोगटातील मुलांसाठी आणि ज्यांचे लसीकरण नुकतेच सुरू झाले आहे अशा 12-14 वयोगटातील मुलांसाठी पूर्णपणे प्रत्यक्ष उपस्थितीत शाळा सुरू करण्याचा निर्णय धोकादायक आहे.
जेव्हा संभाव्य चौथ्या लाटेचा धोका मोठ्या प्रमाणात दिसत आहे अशा परिस्थितीत हा निर्णय अयोग्य आहे असे त्यांनी आपल्या याचिकेत नमूद केले होते.