डेहराडून -भाजपच्या आमदार रितू खंडुरी यांनी शनिवारी उत्तराखंड विधानसभेच्या पहिल्या महिला सभापती बनण्याचा मान मिळवला. रितू यांची त्या पदावर बिनविरोध निवड झाली.
उत्तराखंडमधील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या कॉंग्रेसने सभापतिपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार दिला नाही. त्यामुळे रितू यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. त्या माजी मुख्यमंत्री बी.सी.खंडुरी यांच्या कन्या आहेत.
त्या दुसऱ्यांदा आमदार बनल्या आहेत. उत्तराखंडमध्ये नुकतीच विधानसभा निवडणूक झाली. त्या निवडणुकीत बाजी मारून भाजपने त्या राज्याची सत्ता राखली.
त्यानंतर काही दिवसांपूर्वी उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते पुष्करसिंह धामी यांनी सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी सुत्रे स्वीकारली. आता उत्तराखंड विधानसभेच्या सभापतीही निश्चित झाल्या आहेत.