इस्लामाबाद – लतादिदींनी अनेक दशके संगीताच्या जगावर राज्य केले, त्यांच्या आवाजाची जादू यापुढेही कायमच राहील अशा शब्दात पाकिस्तानचे माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी आज त्यांना श्रद्धांजली वाहिली. चौधरी यांनी बीजिंगमधून उर्दूमध्ये ट्विटरवर हा शोकसंदेश जारी केला. चौधरी सध्या पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाबरोबर चीनच्या दौऱ्यावर आहेत.
जिथे जिथे उर्दू बोलली आणि समजली जाते, तिथे लता मंगेशकर यांना कायम स्मरणात ठेवले जाईल असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी इंग्रजीतही स्वतंत्रपणे ट्विट करून दिदींना आदरांजली वाहिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, “एक आख्यायिका आता राहिली नाही.
लता मागेशकर या संगीताच्या जगावर अनेक दशके राज्य करणारी एक मधुर राणी होती. त्यांचा आवाज भविष्यकाळातही सर्व लोकांच्या हृदयावर राज्य करत राहील. पाकिस्तान टेलिव्हिजनने लतादिदींच्या निधनाच्या बातमीच्या अनुषंगाने त्यांच्यावरील अनेक प्रसंग आणि त्यांची गाणी सादर केली.