मुंबई – भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.
लतादीदींच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार दि ६ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी ७ फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.