नवी दिल्ली – क्रिप्टो करन्सीवरील उत्पन्नावर प्रचंड कराची तरतूद करून अर्थ मंत्रालयाने काल क्रिप्टोला अप्रत्यक्षरीत्या अंशत: मान्यता दिली आहे. आता पुढील वर्षाच्या प्राप्तिकर विवरणात क्रिप्टो करन्सीमधून मिळालेल्या नफ्यासाठी वेगळा स्तंभ असणार असल्याचे प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे.
महसूल सचिव तरुण वाजपेयी यांनी ही माहिती दिली. एक एप्रिलपासून क्रिप्टो करन्सीवरील नफ्यावर 30 टक्के त्याचबरोबर सेस आणि अधीभार लागू होणार आहे. घोड्याच्या शर्यतीवरील किंवा इतर सट्ट्यासारख्या उत्पन्नावरील करासारखा का कर असणार आहे. वाजपेयी म्हणाले की क्रिप्टो करन्सीवरील नफ्यावर अगोदरच कर होता. आता त्यामध्ये थोडी सुस्पष्टता आली आहे. मात्र क्रिप्टो करन्सीला तांत्रिकदृष्ट्या कायदेशीर मान्यता दिली जाण्याची प्रक्रिया या विषयावरील विधेयक मंजूर झाल्यानंतर पूर्ण होईल. क्रिप्टो करन्सीचे नियमन कसे होणार हे अजून स्पष्ट नाही. ते विधेयकानंतर स्पष्ट होईल. क्रिप्टोला चलन म्हणून मान्यता मिळणार नाही.
क्रिप्टो करन्सीवरील नफ्यावर 30 टक्के कर लागेल. त्याचबरोबर 50 लाखांवरील नफ्यावर 15 टक्के आधीभार लागणार आहे. क्रिप्टो करन्सी व्यवहाराची माहिती प्राप्तिकर खात्याला मिळावी याकरिता प्रत्येक व्यवहारावेळी स्रेतातून एक टक्के कर कपात केली जाणार आहे. टीडीएसची अंमलबजावणी 1 जुलैपासून करण्यात येणार आहे, तर क्रिप्टो करन्सी उत्पन्नावरील कराची अंमलबजावणी एक एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. क्रिप्टोमध्ये तोटा झाला तर तोटा आहे इतर उत्पन्नातून भरून काढता येऊ शकणार नाही. त्यामुळे क्रिप्टो करन्सी व्यवहार करणाऱ्यांची बरीच अडचण होणार आहे.
आतापर्यंतच्या क्रिप्टो व्यवहारावरील कराबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, प्राप्तिकरदाते त्यांच्या विवरणात या संदर्भातील माहिती सादर करू शकतात. त्याची दखल संबंधित अधिकारी घेतील. सध्या काही लोक क्रिप्टोवरील उत्पन्न दाखवून कर भरत आहेत. मात्र काही जण कर टाळत आहेत. त्यामुळे टीडीएस प्रणाली सुरू करण्यात आली आहे. लवकरच रिझर्व्ह बॅंकेचे डिजिटल चलन उपलब्ध होणार आहे. मात्र या चलनाला मालमत्ता समजले जाणार नाही असे सरकारने स्पष्ट केले आहे.