दुबई – संपूर्ण जगातील पर्यटक आणि नागरिक यांचे आकर्षण असणाऱ्या दुबईमध्ये आता वाहतुकीसाठी वेगळा पर्याय निवडला जाणार आहे. दुबईमध्ये नुकतीच उडणाऱ्या मोटारीची यशस्वी चाचणी पूर्ण करण्यात आली असून संबंधित कंपनीने अशा प्रकारच्या मोटारी 2028 पर्यंत उपयोगात आणण्याचा निर्णय घेतला आहे.
ताशी दोनशे सत्तावीस किलोमीटर वेग असणाऱ्या या मोटारी हवेत तीन हजार फूट उंचीवरून उडू शकतात. लंडन मधील वेलबेदर कंपनीने ही अनोखी उडणारी मोटार तयार केली असून आणखी काही चाचण्या पूर्ण केल्यानंतर 2028 मध्ये अशा प्रकारच्या मोटारी व्यावसायिकदृष्ट्या उपयोगात आणण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.
उडणाऱ्या मोटारीची पहिली चाचणी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातच घेण्यात आली होती. त्यानंतर आणखीन सात चाचण्या घेण्यात आल्या, पण पहिल्यांदाच या चाचणीचे निष्कर्ष सार्वजनिक पद्धतीने जाहीर करण्यात आले.
या कंपनीने तीन हजार फूट उंचीवर उडणारी आणि ताशी सव्वादोनशे किलोमीटर पेक्षा जास्त वेग पकडणारी मोटार तयार करण्याचा निर्णय घेतला असला तरी ज्या मोटारीची चाचणी घेण्यात आली त्या मोटारीचा वेग ताशी 40 किलोमीटर असा ठेवण्यात आला होता आणि हवेत 13 फूट उंचीवर ही चाचणी घेण्यात आली.
2028 नंतर सर्वप्रथम या मोटारी सरकारी उपक्रमांना उपलब्ध करून दिल्या जातील नंतर 2030 नंतर खासगी लोकही या प्रकारच्या मोटारी खरेदी करून त्यातून वाहतूक करू शकतात.