कोलंबो – करोनाच्या संकटामुळे विदेशी गंगाजळीच्या तीव्र टंचाईच्या आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेच्या सरकारने देशवासियांसाठी तब्बल 1.2 अब्ज डॉलरचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. आंतरराष्ट्रीय कर्जांच्या परतफेडीचे मोठे आव्हान देशासमोर आहे.
या अडचणींवर मात करणे अवघड आहे, असे देशाच्या प्रमुख वित्तीय संस्थांनी म्हटले आहे. असे असले तरी आंतरराष्ट्रीय कर्जांच्या आघाडीवर देशाकडून परतफेड थकवली जाणार नाही, असे अर्थमंत्री बासिल राजपक्षे यांनी म्हटले आहे.
श्रीलंकेला आगामी पंधरावड्यात 500 दशलक्ष डॉलरच्या वित्तीय बॉन्डचे पेमेंट करायचे आहे. हे पेमेंट श्रीलंका नक्की करेल, असा विश्वास राजपक्षे यांनी व्यक्त केला आहे.
नवीन वित्तीय पॅकेजसाठी 229 अब्ज श्रीलंकन रुपये उपलब्ध करून दिले जातील. या पॅकेज अंतर्गत 15 लाख सरकारी कर्मचारी, सेवानिवृत्त आणि दिव्यांग सैनिकांना दर महिन्याला 5 हजार रुपयांचा विशेष भत्ता दिला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय बॉन्डच्या वित्तीय संस्थांना फेरवाटाघाटींसाठी निमंत्रित करण्यात येईल, असेही राजपक्षे यांनी सांगितले.