पुणे – डेक्कन जिमखाना क्लब यांच्या वतीने नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटी (एनइसीसी) प्रायोजित आयटीएफ, एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 20 व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 25 हजार डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत एकेरीत श्रीवल्ली रश्मिका भामिदीप्ती, कारमान कौर थंडी, वैदेही चौधरी, फरहात अलीन कमर या चार भारतीय खेळाडूंनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. तर, पुण्याच्या ऋतुजा भोसले हिला पहिल्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागल्याने तिचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आले.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या श्रीवल्ली रश्मिका भामिदीप्ती हिने कडवी झुंज देत पुण्याच्या व नुकत्याच सोलापूर आयटीएफ स्पर्धेत विजेतेपद पटकावलेल्या ऋतुजा भोसलेचा 0-6, 6-4, 6-0 असा तीन सेटमध्ये पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला.
हा सामना 1 तास 56 मिनिटे चालला. सामन्यात पहिल्या सेटमध्ये ऋतुजाने सुरेख खेळ करत पहिल्याच गेममध्ये श्रीवल्लीची सर्व्हिस रोखली व स्वतःची सर्व्हिस राखत आघाडी घेतली. या सेटमध्ये ऋतुजाने वर्चस्व राखत श्रीवल्लीला कमबॅक करण्याची संधीच दिली नाही व हा सेट 6-0 असा सहज जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये श्रीवल्लीला अखेर सूर गवसला.
सामन्यात 2-1 अशी स्थिती असताना श्रीवल्लीने ऋतुजाची चौथ्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली. या सेटमध्ये श्रीवल्लीने आक्रमक खेळ करत हा सेट ऋतुजाविरुद्ध 6-4 असा जिंकून बरोबरी साधली.