पुणे -मुळा नदीची पूररेषा जलसंपदा विभागाने निश्चित करून दिली आहे. त्यामुळे “पीएमआरडीए’ने हाती घेतलेल्या पहिल्या नगररचना योजनेच्या (टीपी स्कीम) क्षेत्रफळात बदल होणार आहे. या बदललेल्या क्षेत्रफळाची दखल घेऊन “पीएमआरडीए’ पुन्हा एकदा या योजनेचे नकाशे तयार करून प्रसिद्ध करणार आहे. त्यामुळे वाटप झालेल्या भूखंडाचे फेरनियोजन होण्याची शक्यता आहे.
पुणे महानगर क्षेत्र विकासासाठी राज्य सरकारने “पीएमआरडीए’ची स्थापन करण्यात आली. त्यानंतर “पीएमआरडीए’ने पहिल्याच टप्प्यात सुमारे 250 हेक्टर वरील म्हाळुंगे-माण टीपी स्कीमचे काम हाती घेतले होते. या स्कीमला सर्व प्रकाराच्या मान्यता मिळाल्या होत्या. तसेच हरकती-सूचनांवर सुनावणी घेऊन भूखंडाचे वाटपही “पीएमआरडीए’ने निश्चित केले होते. तर वाटप करण्यात आलेल्या भूखंडाचे प्रॉपर्टी कार्ड तयार करून रहिवाशांना वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले होते.
परंतु या टीपी स्कीम करताना मुळा आणि मुठा नदींची पूररेषा दर्शविण्यात आली नव्हती. दरम्यान, जलसंपदा विभागाने ती निश्चित करून “पीएमआरडीए’कडे दिली आहे. त्यामुळे या दोन्ही नदी काठचे काही भूखंड पूररेषेमध्ये येत आहेत.
त्यामुळे पुन्हा स्किमची फेररचना करावी लागणार आहे. यामुळे याबाबत जाहीर निवेदन देऊन पीएमआरडीएने या योजनेचे फेररचना करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे नगररचना योजनेच्या क्षेत्रात बदल होणार आहे. त्या दृष्टीने पीएमआरडीएकडून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
जलसंपदा विभागाने मुळा-मुठा नदीची पूररेषा निश्चित करून दिली आहे. काही भूखंड हे पूररेषेत येत असल्यामुळे त्यांचे फेरनियोजन करावे लागणार आहे. हे करत असताना नगररचना योजनेच्या क्षेत्रफळात कोणताही बदल होणार नाही. त्याबाबतचे जाहीर निवेदन देण्यात आले असून एक महिन्यानंतर पुन्हा या स्कीमचे नकाशे प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
– अभिराज गिरकर, महानगर नियोजनकार, पीएमआरडीए