सांगवी -पिंपळे गुरव, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, जुनी सांगवी व नवी सांगवी परिसरात अवघ्या पाच स्टॉल धारकांकडेच फटाके विक्री परवाना आहे. तर जवळपास 50 फटाके स्टॉल बेकायदेशीर असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. परंतु प्रशासनाचे यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
महापालिका क्षेत्रात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फटाके विक्री दुकानांसंदर्भात धोरण असून, त्याची अंमलबजावणी करावी लागते. रहिवासी भागात फटाका विक्री दुकानांना परवानगी देण्यात येत नाही.
शहरात फटाक्यांच्या विक्रीसाठी अग्निशमन विभागाकडून परवानगी देण्यात येते. मात्र, या वर्षी पिंपरी-चिंचवड शहरातील बहुसंख्य भागांमध्ये बेकायदेशीर फटाका स्टॉल उभारले असून, कसल्याही प्रकारचे सुरक्षाविषयक नियम पाळले जात नाहीत.
प्रशासनाकडून दरवर्षी फटाके स्टॉलधारकांना परवाना काढण्याचे आवाहन करण्यात येते. मात्र परवाना काढण्यासाठी धावपळ करण्यापेक्षा बेकायदेशीर स्टॉल चालवण्यास हे स्टॉलधारक प्राधान्य देत असल्याने नागरिकांच्या व लहान मुलांच्या जिवाशी उघडपणे खेळ केल्याचा गंभीर प्रकार होत आहे. फटाके स्टॉलवर विक्रीस ठेवताना प्रशासनाने काही नियम ठरवून दिले आहेत.
बेकायदेशीर फटाका स्टॉलवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे, असे सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांनी सांगितले.