काबुल – अफगाणिस्तानमधील हेमंड प्रांतात करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात 30 पाकिस्तानींसह 112 तालिबानी दहशतवादी ठार झाले आहेत. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
ठार झालेले पाकिस्तानी दहशतवादी भारतीय उपखंडात अल कायदाशी संबंधित कारवाया करत होते, असेही अफगाणी संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. या हवाई हल्ल्यांमध्ये अन्य 31 जण जखमी देखील झाले आहेत. लष्करगाह शहराच्या जवळच अफगाणी हवाई दलाच्यावतीने हा हवाई हल्ला करण्यात आला, असे अफगाणी संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
अफगाणी सैन्याच्याविरोधात तालिबान्यांना पाकिस्तानकडून मदत होत असल्याचा आरोपही अफगाणी सैन्याने केला आहे.
दरम्यान संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत अफगाणिस्तानचा मुद्दा उपस्थित झाला आहे. तालिबानला पाकिस्तानकडून सहाय्य होत असल्याचे पुरावे आपण संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत सादर करण्यास तयार असल्याचे अफगाणी प्रतिनिधीने सांगितले. यासंदर्भात पाकिस्तानकडे वारंवार पुरावे सादर केले गेले आहेत, असेही अफगाणी प्रतिनिधीने सांगितले.
तालिबानने जवजान शहरातील शेबेरघन शहरावर ताबा मिळवला आहे. कालच तालिबान्यांनी निमरोज मधील झेरांझ शहरावरदेखील ताबा मिळवला आहे. येथील सुरक्षा रक्षकांनी तालिबानला घाबरुन पळ काढल्यामुळे हे शहर आपोआपच तालिबानच्या ताब्यात पडले. तालिबान आता इराणच्या पश्चिम सीमेजवळच्या हेरातसह दक्षिणेकडील लष्कर गाह आणि कंदहारसह अन्य प्रांतीय राजधान्यांमध्ये सरकारी सैन्याला आव्हान देत आहे.