नवी दिल्ली – करोना संसर्गाने देशात थैमान घातलं. त्यामुळे करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम देशभरात वेगाने राबविण्यात येत आहे. मात्र अनेकांना लस घेऊन देखील करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यातच आता कोणती लस शरीरात अधिक अँटीबॉडी तयार करते हे अभ्यासातून उघड झालं आहे.
शरीरात करोना व्हायरसविरुद्ध अँटीबॉडी तयार करण्यासाठी कोविशिल्ड लस अधिक प्रभावी आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या अभ्यासातून हे समोर आलं आहे. कोविशिल्ड लस माणसाच्या शरिरात कोवॅक्सिनपेक्षा अधिक अँटीबॉडी तयार करते. या संदर्भातील अभ्यास ‘करोना व्हायरस इंड्युस्ड अँटीबॉडीज ट्रीटे’ने केला आहे.
या अभ्यासात आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता, ज्यांनी कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन लस घेतली होती. या अभ्यासातून समोर आलं की, कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर शरिरात अँटीबॉजची पातळी कोवॅक्सिनच्या तुलनेत अधिक आहे. मात्र या अभ्यासाला क्लिनिकल प्रॅक्टीसमध्ये सामील करण्यात आलेलं नाही.
या अभ्यास नमूद करण्यात आलं की, करोनाला रोखण्यासाठी दोन्ही व्हॅक्सिन प्रभावी ठरत आहे. दोन्हीपैकी कोणत्याही लसीचे दोन्ही डोस घेतल्यास परिणाम चांगले आहे. हा अभ्यास ५५२ आरोग्य कर्मचाऱ्यांवर करण्यात आला. यामध्ये ३२५ पुरुष आणि २२७ महिलांचा समावेश होता. यापैकी ४५६ लोकांना कोविशिल्ड लस घेतली होती. तर ९६ जणांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला होता.
यापूर्वी आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव यांनीही म्हटलं होत की, कोविशिल्ड लसीच्या पहिल्या डोसनंतर शरीरातील अँटीबॉडीजचे प्रमाण झपाट्याने वाढते. तर कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस घेतल्यानंतर अँटीबॉडीचे प्रमाण वाढते.