उमरिया – मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला. पॉवर बँकच्या सहाय्याने मोबाईल चार्ज करताना मोठा स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता की, घराचं छत देखील स्फोटामुळे उचकटलं. तर मोबाईल चार्ज करणाऱ्या युवकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
ही घटना उमरिया जिल्ह्यातील छपरौड गावात घडली. गावातील 28 वर्षीय तरूण राम साहिल सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास पॉवर बँकच्या सहाय्याने मोबाईल चार्ज करत होता. मोबाईल त्याच्या हातातच होता. त्याचवेळी पॉवर बँकचा स्फोट झाला आणि घरात धावपळ उडाली. या स्फोटामुळे घराच्या छताचे मोठे नुकसान झाले आहे.
स्फोट एवढा भीषण होता की, घराच्या भिंतींनाही तडे गेले आहेत. याच बरोबर मोबाईल चार्ज करणारा तरूणही घरात जखमी अवस्थेत पडला होता. घरच्या मंडळींनी जखमी तरुणाला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
स्फोट झालेली पॉवर बँक नेमकी कोणत्या कंपनीची होती, हे अद्याप कळू शकलं नाही. मात्र, घटनेनंतर पॉवर बँकच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. उमरिया जिल्हा मागास असून ग्रामीण भागात विजेची समस्या आहे. त्यामुळे लोक पॉवरबँक वापरण्यास प्राधान्य देतात. मात्र पॉवरबँकच्या स्फोटाने पॉवरबँक वापरावी की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.