- बाधितांची संख्या तीनशेच्यावर
- 30 रुग्णांचा मृत्यू
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात गेले दोन दिवस करोनाबाधित रुग्णांची संख्या तीनशेपेक्षा कमी होती. मात्र आज त्यामध्ये पुन्हा वाढ झाली असून बाधितांची संख्या तीनशेच्या वर गेली आहे. शहरात आज 372 नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले. तर 30 जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे.
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, बुधवार (दि. 2) शहरात 372 जणांना करोनाची लागण झाली. तर शहराबाहेरील रुग्णांची आकडेवारी पालिका प्रशासनाने प्रसिद्ध केली नाही. आजपर्यंत शहरातील 2 लाख 51 हजार 57 जणांना करोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात 30 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामध्ये शहरातील 19 व शहराबाहेरील 11 जणांचा समावेश आहे. आजपर्यंत शहरातील व शहराबाहेरील 6147 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
दिवसभरामध्ये 276 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 41 हजार 786 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 6424 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तपासणीसाठी दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. किती रुग्णांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत याबाबत पालिकेने आकडेवारी जाहीर केली नाही. सद्यस्थितीत शहरातील महापालिकेची रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 2686 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 2485 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 5171 इतकी आहे.