पिंपरी – महापालिकेला सीएसआर फंडातून 48 व्हेंटीलेटर उपलब्ध झाले आहेत. हे व्हेंटीलेटर खासगी रुग्णालयांना तात्पुरत्या स्वरूपात अटी व शर्तींवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. व्हेंटीलेटरची देखभाल व दुरुस्ती रुग्णालयांनी स्वतः करावयाची आहे. महापालिकेच्या वॉर रूममधून नोंद झालेल्या रुग्णांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. पुरवठा केलेल्या व्हेंटीलेटरवर उपचार करून घेत असलेल्या रुग्णांना व्हेंटीलेटरच्या नियमित दराच्या 50 टक्के दर आकारण्यात यावे, या अटीवर हे व्हेंटीलेटर देण्यात आले आहेत.
एकूण 10 खासगी रुग्णालयांमध्ये हे व्हेंटीलेटर बसविण्यात आले आहे. डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज (संत तुकारामनगर, पिंपरी) – 10, लोकमान्य रुग्णालय (निगडी) – 5, लोकमान्य रुग्णालय (चिंचवड) – 3, स्टार हॉस्पिटल (आकुर्डी) – 5, आदित्य बिर्ला रुग्णालय (थेरगाव) – 5, निरामय रुग्णालय (चिंचवड) – 5, अकॉर्ड हॉस्पिटल (भोसरी) – 4, ब्रम्हचैतन्य हॉस्पिटल – 5, आयुर्वेद जेने. हॉस्पिटल, आकुर्डी (स्टर्लिंग हॉस्पिटल) – 4, ओजस मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल (रावेत) – 2 आदी रुग्णालयांना व्हेंटीलेटर देण्यात आले आहे.
खासगी रुग्णालयांना महापालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या व्हेंटीलेटरचे नियोजन व उपलब्धता यासाठी एक समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. त्यासाठी सह-शहर अभियंता श्रीकांत सवणे यांची नियुक्ती केली आहे. व्हेंटीलेटर बेडसाठी लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांची मागणी आल्यास त्यांच्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची जबाबदारी सवणे यांच्यावर आयुक्त राजेश पाटील यांनी सोपविली आहे.