चेन्नई, – यंदाच्या मोसमात दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली आहे. त्यांचा सामना रविवारी सनरायजर्स हैदराबादशी होणार आहे. चेपॉकच्या संथ खेळपट्टीवर रशिद खान विरुद्ध ऋषभ पंत यांच्यात सामना रंगण्याची शक्यता आहे.
संथ खेळपट्टीमुळे टीका होत असलेल्या चेन्नईत यंदाच्या सत्रातील दहावा आणि अखेरचा सामना उद्या होणार आहे. या खेळपट्टीवर पंत आणि हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर हे मोठी धावसंख्या उभारण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या आतापर्यंतच्या 9 लढतीत केवळ दोन वेळा 170 पेक्षा अधिक धावसंख्या उभारता आलेली आहे.
या खेळपट्टीवर फलंदाजांना धावा करण्यासाठी कडवा संघर्ष करावा लागत आहे. अशा खेळपट्टीवर “पॉवर हिटिंग’ महत्त्वपूर्ण ठरत असल्याने दिल्लीचा कर्णधार पंतकडून संघाला मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. शिखर धवनही फॉर्मात आहे. परंतु पृथ्वी शॉ पहिल्या सामन्यानंतर अपयशी ठरत आहे. यामुळे पंतवरील जबाबदारी वाढली आहे.
दुसरीकडे हैदराबादने आपले चारही सामने याच मैदानावर खेळले असल्याने त्यांना खेळपट्टीचा थोडा अंदाज आलेला आहे. यामुळेच हैदराबादने सलग तीन पराभव पत्करल्यानंतर अखेरच्या लढतीत पंजाब किंग्जवर 9 गडी राखून दणदणीत विजय मिळविला होता. हैदराबाद संघात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनचे पुनरागमन झाल्याने त्यांची फलंदाजी संतुलित झाल्याचे दिसून येत आहे. तसेच मनीष पांडेही 112च्या स्ट्राइक रेटने धावा काढत आहे. टी. नटराजन जखमी झाल्याने विदेशी खेळाडू वॉर्नर, जॉनी बेयरस्टॉ, विलियमसन आणि रशिद खान यांच्याकडून संघाला आशा आहे.
अफगाणिस्तानचा लेग स्पिनर रशिद खानने आतापर्यत सातत्यपूर्ण कामगिरी केली असून पंतविरोधात त्याच्या गोलंदाजीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. हैदराबादची गोलंदाजी तशी कमकुवत आहे. कारण संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल आणि अष्टपैलू विजय शंकरला अद्याप साजेशी कामगिरी करता आलेली नाही. यामुळे रशिद आणि भुवनेश्वर कुमारची आठ षटके सोडल्यास अन्य षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा करण्यावर दिल्ली संघाचा भर असेल. तसेच दिल्लीची गोलंदाजीही भक्कम आहे.
सामन्याची वेळ
सायंकाळी : 7ः30
ठिकाण ः एम. ए. चिदम्बरम स्टेडियम, चेन्नई
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्सवर