- 508 कोटी रुपये खर्च
- 300 चौरस फुटांची घरे मिळणार
पिंपरी – शहरातील गांधीनगर झोपडपट्टीचे महापालिकेच्या वतीने पुनर्वसन केले जाणार आहे. यासाठी 507 कोटी 90 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. येथील झोपडीधारकांना प्रत्येकी 300 चौरस फुटांच्या सदनिका दिल्या जाणार आहे. यासाठी तब्बल 11 मजली भव्य इमारत उभारली जाणार आहे. या इमारतीमध्ये येथील झोपडीधारकांचे पुनवर्सन केले जाणार आहे. यामध्ये 2 हजार 32 झोपडीधारकांना याचा लाभ मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पुनर्वसनाबाबत स्थानिक तसेच वेगवेगळ्या संघटनांकडून आंदोलने सुरू आहेत.
शहराच्या मध्यभागी गांधीनगर झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टीच्याजवळ महिंद्रा हौसिंग सोसायटीची गगनचुंबी इमारत आहे. तसेच हाकेच्या अंतरावर महापालिकेचे मुख्यालय आहे. सन 2002 मध्ये मशाल संस्थेच्या वतीने या झोपडपट्टीचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यावेळी 1 हजार 450 झोपड्या असल्याचे आकडेवारीमध्ये नमूद करयात आले आहे. आज त्याठिकाणी 62 हजार 714 चौरस मीटर क्षेत्रफळ जागेवर गांधीनगर झोपडपट्टी वसली आहे. गुगल मॅप आणि भूखंड व्याप्तीनुसरा याठिकाणी 2 हजार 32 झोपड्या आहेत. महापालिकेने या झोपडपट्टीचे पुनर्वसन करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी 27 मे 2020 रोजी मेसर्स एम.एम प्रोजेक्ट कन्सलटंट प्रायव्हेट लिमिटेड यांची सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे. या सल्लागाराने ड्राफ्ट कन्सेप्ट रिपोर्ट आणि संकलन आराखडा महापालिका पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना सादर केला. हा गृहप्रकल्प झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) नियमावलीनुसार राबविला जाणार आहे.
गांधीनगर झोपडपट्टीतील झोपडीधारकांना 300 चौरस फूटाच्या सदनिका मोफत दिल्या जाणार आहेत. यासोबतच साडेचारशे ते 600 चौरस फूटांच्या 476 सदनिका आणि 344 वाणिज्य गाळ्यांची खुल्या बाजारात विक्री केली जाणार आहे. 300 चौरस फूटांच्या सदनिकांसाठी 3 हजार 360 रुपये प्रति चोरस बांधकाम दर गृहित धरण्यात आला आहे. पुनर्वसन प्रकल्पातील इमारतीची उंची 40 मीटर ते विक्रीयोग्य सदनिकांच्या इमारतींची उंची 70 मीटर निश्चित करण्यात आली आहे. वीस मजली इमारतीमधील 476 सदनिका आणि 344 वाणिज्य गाळे विक्रीसाठी उपलब्ध असतील. त्यासाठी 3 चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) वापरला जाणार आहे. प्रकल्पासाठी 507 कोटी 96 लाख रुपये खर्च गृहित धरण्यात आला आहे. झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करताना लाभार्थ्यांना ट्रान्झिट कॅम्प आणि त्यासाठीच्या सर्व सुविधा पुरविल्या जाणार आहे. ट्रान्झिटसाठी स्थलांतरित केल्या जाणाऱ्या झोपडीधारकांना बिल्डरमार्फत निवारा, घरभाडे, वीज, पाणी किंवा रोख रक्कमेची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या प्रकल्पासाठी विस्तृत आराखडा तयार करून त्यासाठी येणाऱ्या प्रत्यक्ष खर्चास मान्यता देण्यासाठी हा विषय येत्या गुरूवारी (दि. 18) होणाऱ्या महापालिकेच्या महासभेमध्ये मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.
हाकेच्या अंतरावर सर्व सोयी-सुविधा
शहराच्या मध्यभागी गांधीनगर झोपडपट्टी आहे. त्याचठिकाणी त्याचे पुनर्वसन केले जाणार आहे. त्यामुळे याठिकाणी सर्व सोयी-सुविधा तात्काळ उपलब्ध होणार आहे. या ठिकाणाहून महापालिकेचे वायसीएम रुग्णालय अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे. तर इतर खासगी रुग्णालये देखील हाकेच्या अंतरावर आहे. पीएमपीचा बसथांबाही येतून जवळच आहे. तसेच शहरातील प्रमुख धार्मिक स्थळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा या परिसरामध्ये आहे. पिंपरी वाहतूक विभाग याठिकाणी आहे. तसेच येथील पिंपरी चौकामध्येच महापालिकेचे मुख्यालय आहे. त्यामुळे येथील जागा अत्यंत महत्तवाची आहे.
गांधीनगर झोपटपट्टी पुनर्वसनाचे ठळक मुद्दे
1) 300 चौरस फूटांच्या सदनिका तयार होणार
2) 476 सदनिका व 344 वाणिज्य गाळ्यांची खुल्या बाजारात विक्री
3) 2 हजार 32 झोपडीधारकांना मिळणार लाभ
4) 508 कोटी रुपये खर्च होणार