वाघोली (पुणे) – गेल्या वर्षी भारतासह संपूर्ण जगात करोनाने थैमान घातले होते. या काळात अनेकांनी स्वःइच्छेने आरोग्यदूत म्हणून काम केले. यामध्ये लाखो आजी-माजी सरपंच आणि उपसरपंच तसेच स्वयंसेवकांचा समावेश होता. या करोना योद्ध्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता महान कार्य केले. त्यांच्या याच कार्याला सलाम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेने एक गाण्याची निर्मिती केली आहे. हिरो सरपंच नावाचे हे गाणे एक वेस्टर्न सॉंग असून आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी असे या गाण्याचे बोल आहेत. नुकताच या गाण्याचा अनावरण सोहळा महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते मा. नामदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते मुंबईत पार पडला.
या गाण्याला प्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केले असून अवधूत गुप्ते आणि आदर्श शिंदे यांनी स्वरबद्ध केले आहे. तर गाण्याला महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष नवनाथ काकडे यांनी शब्दबद्ध केले आहे. या गाण्याचा मुख्य उद्देश म्हणजे सर्व आजी माजी सरपंच आणि उपसरपंच यांच्या या महान कार्याला एक सलाम असून यातून सत्कर्म करण्यासाठी प्रेरणा देण्याचाही हा एक प्रयत्न आहे.
सरपंच हा त्या गावासाठी किती महत्वाचा असतो हे मी अनुभवले आहे, गावाचा विकास हाच त्याचा ध्यास असतो. सामान्य माणसाला सरपंच आणि त्याचे कार्य सोप्या शब्दात सांगणारे हे गाणं आमच्या संपूर्ण टीमकडून महाराष्ट्रातल्या सर्व सरपंच आणि उपसरपंच यांना कृतज्ञता पूर्ण एक भेट आहे. गाण्याचे लेखन आणि निर्मिती महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष नवनाथ काकडे यांनी केले आहे, तर संगीत संयोजक म्हणून प्रदीप कार्लेकर यांनी काम पाहिले आहे. तर रिदम आदेश मोरे, सचिन भांगरे यांचे असून, संगीत सहायक नितीन ढोले, ध्वनी अभियंता अवधूत वाडकर यांनी केले आहे. ध्वनी मिश्रण हे डॉनल व्हेलन लंडन येथील असून छायाचित्रण प्रथमेश रांगोळे यांनी केले आहे.