रांची – अंमलबजावणी संचालनालय मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात निलंबित झारखंडच्या सनदी अधिकारी पूजा सिंघल आणि इतरांची 82.77 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करणार आहे. निदेशालयाने सांगितले की, मालमत्ता जप्त करण्याच्या आदेशाची पुष्टी मनी लॉंडरिंग विरोधी कायद्याच्या निर्णय प्राधिकरणाने केली आहे.
कायद्यानुसार, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉंडरिंग ऍक्टअंतर्गत न्यायनिर्णय प्राधिकरणाच्या तात्पुरत्या आदेशाची पुष्टी केल्यानंतर एजन्सी संलग्न मालमत्ता जप्त करू शकते. जी मालमत्ता जप्त करण्यात आल्याची पुष्टी करण्यात आली आहे त्यांची किंमत 82.77 कोटी रुपये आहे आणि ती पीएमएलएच्या तरतुदींनुसार 1 डिसेंबर रोजी ईडीने तात्पुरत्या स्वरूपात जप्त केली होती. मालमत्तेमध्ये ‘पल्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’ नावाचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ‘पल्स डायग्नोस्टिक अँड इमेजिंग सेंटर’ नावाचे डायग्नोस्टिक सेंटर, त्यांचे प्लांट आणि मशिनरी आणि रांची येथे दोन भूखंडांचा समावेश आहे.
सिंघल, या वर्ष 2000 बॅचच्या भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी असून त्यांना अंमलबजावणी संचालनालयाने 11 मे रोजी मनरेगा योजनेतील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लॉंड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली होती. त्यांनी झारखंड खाण सचिवपद भूषवले होते आणि अटक झाल्यानंतर राज्य सरकारने त्यांना निलंबित केले होते. सिंघल सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्या रांची येथील होटवार तुरुंगात आहे. या प्रकरणात सिंघल यांचे व्यापारी पती आणि त्यांच्या चार्टर्ड अकाउंटंटचाही समावेश आहे.