रशियाचा चीनवर अचानक हल्ला?
हॉंगकॉंग, ता. 6 – रशियन सैन्याने चीनवर जर अचानक हल्ला केला तर तयार असावे म्हणून चिनी सरहद्द सैनिक अगदी सज्ज ठेवण्यात आले आहेत, असे पेकिंग रेडिओवरून जाहीर करण्यात आले आहे. साम्राज्यवादी राष्ट्रांचे जागतिक युद्ध होण्याचा संभव आहे असे चिनी कम्युनिस्ट पक्षाने जाहीर केले आहे.
पायी जगप्रवास करणारे 2 भाऊ कलकत्त्यात
कलकत्ता – डेव्हिड कुन्स्ट व पीटर कुन्स्ट हे दोघे भाऊ पायी जगप्रवासास निघाले आहेत. ते आज येथे आले आहेत. 2 जून 1970 रोजी ते अमेरिकेतील मिनेसोटा राज्यातून निघाले. त्यांचे स्वागत येथे करण्यात आले त्यामुळे ते भारावून गेले. त्यांच्याजवळ एक खेचर आहे. त्या खेचराच्या पाठीवर त्यांचे सामान ठेवण्यात येते. ते दोघे दिल्लीहून येथे आले. दिल्लीहून त्यांना येथे येण्यासाठी मेटिवेशन 44 दिवस लागले.
कानाने वाचण्याची सोय
नवी दिल्ली – अंधांना वरदानच ठरेल अशी एक नवी सोय रशियन शास्त्रज्ञांच्या प्रयत्नामुळे उपलब्ध झाली आहे. या सोयीमुळे आता अंधांना “कानाने वाचता’ येईल. सध्या अंधांना “ब्रेल’ लिपीतील मजकूर स्पर्शज्ञानाने “वाचता’ येतो.
नवीन उपकरण हे छोट्या पेटीसारखे आहे व दृश्य प्रतिमांचे आवाजाच्या खुणात रूपांतर करण्याची सोय त्या पेटीत आहे. आवाजाच्या तीव्रतेत व वेळेत कमीजास्त फरक केला जातो व अशा खुणांच्या साह्याने अंध “वाचू’ शकतात.
जगाची विशिष्ट घडी बसविण्याचा काही थोड्या राष्ट्रांचा प्रयत्न हाणून पाडा – इंदिरांजींचा इशारा
ऑल्जियर्स – अलिप्त राष्ट्रांच्या चौथ्या परिषदेपुढे पंतप्रधान इंदिरा गांधींनी 15 मिनिटे भाषण केले. त्यावेळी त्यांनी असा इशारा दिला की, काही थोड्या देशाचे हितसंबंध सुरक्षित राहण्यासाठी जगाची विशिष्ट घडी बसविण्याचा त्या देशाचा प्रयत्न अलिप्त राष्ट्रांनी हाणून पाडला पाहिजे.