बांगलादेशातील असंतुष्ट लष्करी गटाचा उठाव मोडला
डाक्का, दि. 4 – लष्करातील असंतुष्ट गटांनी केलेल्या उठावाचा बीमोड करण्यात आला आहे, असे बांगलादेशाचे अध्यक्ष मे. ज. झियाउर रहमान यांनी आज रेडिओवरून बोलताना सांगितले. हा उठाव स्थानिक लष्करी तुकड्यांनी व राखीव दलातील सैनिकांनी चिरडून टाकला, असे सांगून जन.
रहमान म्हणाले, “काही बेशिस्त सैनिकांनी हा उठाव केला होता. देश प्रगतीकडे वाटचाल करीत असतानाच हे घडले आहे. जन. झिया यांचे रेडिओवर 7 मिनिटे भाषण झाले. लष्करातील परस्पर विरोधी गटात लढाई होऊन यशस्वी लष्करी क्रांती झाली. पायदळ, हवाईदळ, नाविकदळ, विद्यार्थी व पोलिसांनी यात भाग घेतला.
यूनोच्या आमसभेत वाजपेयी हिंदीत बोलणार
वॉशिंग्टन – येत्या यूनोच्या सर्वसाधारण बैठकीपुढे भारताचे परराष्ट्रमंत्री अटलबिहारी वाजपेयी हे हिंदी भाषेत भाषण करणार आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांत हे हिंदीत भाषण करणारे पहिलेच असतील. वाजपेयी याबाबत म्हणाले, यूनोत हिंदी भाषा समाविष्ट करावी हे मत जागतिक हिंदी परिषदेनेच मांडले होते.
मी हिंदी भाषेत बोलेन. त्याची भाषांतरे अन्य भाषांत केली जातील. त्यासाठी खर्च बराच येतो. भारताचे अर्थमंत्र्यांनी पैशाची तरतूद केली तर मी यूनोत हिंदी भाषेचा अंतर्भाव करीन. परराष्ट्रमंत्री अटलबिहारी वाजपेयी हे सध्या यूनोच्या परिषदेसाठी अमेरिका दौऱ्यावर आहेत.